जामखेड ब्रेकिंग : दमदार पावसामुळे जामखेड – पाटोदा रस्ता वाहतुकीस बंद, वाहतुकीसाठी ‘या’ पर्यायी मार्गाचा वापर करावा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल रात्रीपासून जामखेड व आजूबाजूच्या परिसरात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. या पावसामुळे भवर नदीला पुरसदृश्य परिस्थिती ननिर्माण झाल्याने जामखेड- पाटोदा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. पाटोदा येथील भवर नदीचा पुर ओसरेपर्यंत कोणीही धाडस करून या भागातून वाहतुक करू नये असे अवाहन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
सध्या आढळगाव ते जामखेड या भागापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. याच भागातील जामखेड ते अरणगाव या मार्गावरील पाटोदा (गरडाचे) या ठिकाणी भवर नदीवरील पुलाचे काम सुरु आहे. काल रात्रीपासून जामखेड तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. दमदार पावसामुळे भवर नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. नदीपात्रातून वाहने जाऊ नयेत यासाठी स्थानिक प्रशासन आणि माजी सरपंच गफ्फारभाई पठाण घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
पाटोद्याच्या पुलाचे काम सुरु असल्यामुळे जामखेड ते अरणगावची वाहतुक खंडीत होऊ नये यासाठी ठेकेदार कंपनीने नदीपात्रापासून बायपास मार्ग तयार केला होता. काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे भवर नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले. पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने नदीपात्रातील बायपास रस्ता वाहून गेला आहे. यामुळे जामखेड- अरणगाव रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. नदीचे पाणी कमी झाल्यानंतर या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करून तो वाहतुकीस खुला केला जाणार आहे.
पाटोद्याच्या भवर नदीवरील रस्ता वाहतुकीस बंद झाल्यामुळे वाहन धारकांनी पाण्यातून वाहने घालू नये. जामखेडला जाणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे अवाहन जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.
श्रीगोंद्याहून जामखेडला जाणाऱ्या वाहनधारकांनी खालील मार्गाचा वापर करावा
जामखेड तालुक्यातील पाटोदा गावानजीक भवर नदीला पाणी आल्यामुळे पाटोदा जामखेड रस्ता बंद झाला आहे.नदीला पाणी असल्याने कोणीही नदीतून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू नये.
सध्या जामखेडला जाण्यासाठी आरणगाव पिंपरखेड फक्राबाद कुसडगाव जामखेड या मार्गाचा वापर करावा. आरणगाव आष्टी कडे जाणारा मार्ग बंद आहे. त्यामुळे माही जळगाव वरून जामखेड येणाऱ्या वहानांनी वरील मार्गाचा वापर करावा असे अवाहन तहसीलदार योगेश चंद्रे आणि पाटोद्याचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी केले आहे.
यावेळी कल्याण कवादे पाटील, भाऊसाहेब कवादे, मच्छिंद्र लंगे, प्रकाश मोरे, खंडु राजे कवादे, मुकुंद आप्पा कडु, प्रकाश कडु, सोमनाथ टाफरे, जोगेंद्र थोरात, देवा मोरे, समीर पठाण नवनाथ महारनवर, वैभव महारनवर, बाबासाहेब गरड, अशोक काटकर, नानाभाऊ गव्हाणे सह आदी उपस्थित होते.