जामखेड ब्रेकिंग : अखेर सरपंच निलेश पवार यांच्या सत्तेला लागला सुरुंग, अविश्वास ठराव बहुमताने मंजुर !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील बावी ग्रामपंचायतमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बावी ग्रामपंचायतचे सरपंच निलेश पवार यांच्याविरोधातील अविश्वास ठराव बहुमताने मंजुर झाला आहे. यामुळे सरपंच निलेश पवार यांच्यावर मोठी नामुष्की ओढवली गेली आहे. सरपंच पवार यांच्याविरोधात सहा सदस्यांनी बंड पुकारत पवार यांच्या मनमानी कारभाराला मोठा सुरूंग लावला. बावीत घडलेल्या या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सदस्यांना विश्वासात न घेणे, महिला सदस्यांना सन्मान न देणे, मनमानी कारभार करणे, गैरमार्गाने कारभार करणे सह आदी कारणांवरून जामखेड तालुक्यातील बावी गावचे सरपंच निलेश दादासाहेब पवार यांच्याविरोधात उपसरपंच दादासाहेब मंडलिक, ग्रामपंचायत सदस्य महादेव पोपट कारंडे, प्रियंका गणेश पवार, मनिषा सुनिल कारंडे, सुनिता नानासाहेब कवादे, बायमाबाई गुलाब मंडलिक अश्या सहा सदस्यांनी 21 सप्टेंबर 2023 रोजी जामखेड तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला होता.
बावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर 26 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता बावी ग्रामपंचायतची विशेष सभा बोलावण्यात आली होती. जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपसरपंच दादासाहेब मंडलिक यांनी सरपंच निलेश पवार यांच्याविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला महादेव पोपट कारंडे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी पार पडलेल्या विशेष सभेत अविश्वास ठरावातील विविध मुद्दय़ांवर चर्चा झाली. सर्व सात सदस्य सभेस उपस्थित होते. अविश्वास ठरावातील विविध मुद्दय़ांवर चर्चा करत सहा सदस्यांनी सरपंच निलेश पवार यांच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला. त्यानंतर अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. सहा सदस्यांनी हात वर करून ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यानुसार सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव 6 विरूध्द 1 असा बहुमताने पारित झाला.
जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेस सरपंच निलेश पवार उपसरपंच दादासाहेब मंडलिक, ग्रामपंचायत सदस्य महादेव पोपट कारंडे, प्रियंका गणेश पवार, मनिषा सुनिल कारंडे, सुनिता नानासाहेब कवादे, बायमाबाई गुलाब मंडलिक ग्रामसेवक रफिक तांबोळी, तलाठी दिनेश वासते, शिपाई अशोक राऊत हे उपस्थित होते.