जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील फक्राबाद विशाल महादेव सातव या शेतकरी कुटूंबातील तरूणाची राज्याच्या कृषि विभागात कृषि सहाय्यक म्हणून नाशिक विभागातून निवड करण्यात आली आहे. तर शुभांगी धनंजय राऊत हिची महसुल विभागात तलाठीपदी निवड झाली आहे. शुभांगी आणि विशाल या दोघा शेतकरी पुत्रांनी मिळवलेल्या घवघवीत यशामुळे फक्राबाद गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शेतकरी कुटूंबात जन्मलेले, ग्रामीण भागात वाढलेले, ग्रामीण भागात शिक्षण घेतलेले तरूण तरूणी जिद्दीच्या बळावर, कठोर परिश्रमाच्या बळावर स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतात हेच विशाल आणि शुभांगी या फक्राबाद येथील होतकरू तरुणांनी दाखवून दिले आहे. विशाल सातव व शुभांगी राऊत यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल अजय सातव मित्र मंडळ, भारतीय जनता पार्टी आणि फक्राबाद ग्रामस्थांनी नागरी सत्कार करत गौरव केला.
विशाल सातव बनला कृषि सहाय्यक
शेतकरी कुटूंबात जन्मलेला विशाल सातव याचे प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण श्री अनखेरी देवी विद्यालय फक्राबाद या ठिकाणी झाले. उच्च माध्यमिक शिक्षण अरण्येश्वर विद्यालय आरणगाव या ठिकाणी झाले. तसेच कृषी महाविद्यालय गडचिरोली या ठिकाणी त्याने BSC Agri चे शिक्षण घेतले. बीएससी ॲग्रीला पूर्ण केल्यानंतर त्याने पुणे येथे जात स्पर्धा परिक्षांची तयारी सुरु केली होती. त्याने आजवर अनेक स्पर्धा परीक्षांच्या परिक्षा दिल्या. विशालने कृषी सहाय्यक पदासाठी परीक्षा दिली होती त्यात त्याने घवघवीत यश संपादन केले आहे,
विशाल सातव याची नाशिक विभागात कृषि सहाय्यक म्हणून निवड झाली आहे. विशाल हा आमदार प्रा.राम शिंदे यांचे स्वीय सहायक अजय सातव यांचा भाऊ आहे. विशालला राष्ट्रीयकृत बँकेत मोठ्या पदावर कृषी अधिकारी बनायचे आहे त्यादृष्टीने त्याची कठोर मेहनत सुरु आहे. आई वडिलांनी मी मोठा अधिकारी होणार हे पाहिलेले स्वप्न मी पुर्ण करणारच असा विश्वास विशालने व्यक्त केला आहे.
शुभांगी राऊतची तलाठीपदी निवड
तलाठी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या शुभांगी राऊत हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण फक्राबाद येथेच पुर्ण झाले. शुभांगी हिने 10 वी नंतरचे शिक्षण कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय या ठिकाणी पुर्ण केले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तिने स्पर्धा परिक्षेचा तयारी सुरु केली होती. तिचे PSI होण्याचे स्वप्न आहे. तिने नुकतीच तलाठी पदाची परीक्षा दिली होती. त्यात ती उत्तीर्ण झाली. तिची तलाठीपदी निवड झाली आहे. तिला PSI बनायचे आहे. त्यादृष्टीने तिचा अभ्यास सुरु आहे. मोठे यश गाठण्यासाठी माझी मेहनत सुरुच राहणार असे शुभांगी म्हणाली.शुभांगीचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी मोठी मेहनत घेतली आहे.
अजय सातव मित्र मंडळाकडून विशाल व शुभांगीचा गौरव
शेतकरी कुटूंबातील विशाल सातव आणि शुभांगी सातव यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल फक्राबाद ग्रामस्थ व अजय सातव मित्र मंडळ यांच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार करत गौरव करण्यात आला. यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांचे स्वीय सहायक अजय सातव, मार्केट कमिटीचे संचालक नारायण तात्या जायभाय, युवा नेते मकरंद राऊत, मिठू राऊत, पांडुरंग शिंदे, सुखदेव सातव, महादेव सातव, राहुल राऊत सर, महादेव जायभाय,पोलीस पाटील योगेश जायभाय, ग्रामपंचायत सदस्य गहिनाथ जायभाय, परसराम राऊत, सोसायटीचे व्हॉइस चेअरमन संतोष राऊत, जिल्हा परिषद स्कूल कमिटीचे अध्यक्ष शरद उबाळे, पंढरीनाथ गणगे, युवा उद्योजक उत्तम शिंदे, युवा उद्योजक विजय सातव, शांतिलाल जायभाय मेजर, संजय राऊत सर, मिलिंद राऊत, कृष्णा उबाळे यांच्या हस्ते विशाल व शुभांगाचा गौरव करण्यात आला आला. विशाल व शुभांगी यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.