जामखेड टाइम्स वृत्तसेवा : संपूर्ण जगाला अहिंसेचा विचार देणाऱ्या महात्मा गांधींचे विचार आजही राष्ट्र निर्माणाच्या कार्यात दिशादर्शक आहेत. मानवतेला शांततामय जीवनाची जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा गांधीजींच्या तेजस्वी विचारांकडे पुन्हा परत यावे लागले. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात महात्मा गांधींच्या विचारांचा अंगिकार केल्यास कोणत्याही संकटावर सहज मात करता येऊ शकते, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.गोरक्ष ससाणे यांनी केले.
हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी कृषि महाविद्यालयात आज 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.गोरक्ष ससाणे यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तसेच उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी यावेळी अभिवादन केले.
यावेळी बोलताना डाॅ ससाणे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. त्यांनी दाखवलेल्या अहिंसेच्या मार्गामुळेच इंग्रजांना झुकावे लागले. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचेही कार्य राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण आहे. राष्ट्रपुरूषांच्या जीवन चरित्रांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यांनी दिलेला विचार अन् त्यांनी केलेल्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपण आपले ध्येय निश्चित करायला हवं, असे अवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
दरम्यान, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभर स्वच्छता पंधरवाडा साजरा केला जात आहे.त्या अनुषंगाने आज महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकत्रित येत महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. तसेच महात्मा गांधी यांच्या 154 व्या जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसरातील ऑक्सिजन पार्कमध्ये 154 वृक्षांचे रोपण करत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना कृषि विद्यालयाच्या वतीने अनोखी मानवंदना देण्यात आली.
यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ गोरक्ष ससाणे ,डाॅ. दतात्रय सोनवणे, प्रा.पोपट पवार, प्रा.दादासाहेब धोंडे, विशाल भोसले, डॉ. निकीता धाडगे डाॅ अचना महाजन, प्रदीप धारेकर, धनाजी ठवाळ व कृषी महाविद्यालय हाळगाव येथील सर्व विदयार्थी व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.