जामखेड टाइम्स वृत्तसेवा : मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या अंदोलनाचे लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अंदोलने सुरू आहेत.’आता नाही तर पुन्हा कधीच नाही’ असे म्हणत जामखेड तालुक्यातील मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. येत्या रविवारी जामखेडमध्ये चक्काजाम अंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंदोलनात जामखेड तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे अवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 11 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाचे अंदोलन हाती घेतले आहे. हे अंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असतानाच अंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात पोलिसांनी अंदोलकांवर लाठीचार्ज केल्याने हे अंदोलन देशपातळीवर प्रकाशझोतात आले. त्यांनतर आंतरवली सराटी गावात उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या तसेच सरकारच्या प्रतिनिधींच्या रांगा लागल्या आहेत. संपुर्ण महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी अंदोलने सुरू आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी हाती घेतलेल्या अंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुक्यातील मराठा समाज सरसावला आहे. येत्या रविवारी 10 सप्टेंबर 2023 रोजी जामखेड येथील खर्डा चौकात सकाळी 11 वाजता चक्काजाम अंदोलन हाती घेण्यात आले आहे. शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर या अंदोलनाचे पोस्टर वायरल करण्यात आले. सदरच्या अंदोलनात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन संयोजकांनी केले आहे.