जामखेड : नादच खूळा ! सारोळा प्राथमिक शाळेचा पॅटर्नच निराळा, सारोळा शाळेच्या ‘या’ उपक्रमाची तालुक्यात जोरदार चर्चा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। शाळेचा पहिला दिवस म्हटले की, प्राथमिक शाळेतील मुलांचा उत्साह काही औरच असतो. नव्या शैक्षणिक वर्षांत दाखल होणाऱ्या पहिलीच्या लेकरांना शाळेच्या पहिल्याच दिवशी जर अनोखी भेट मिळाली तर ती मुले आनंदाने शाळेत रमतात, हाच धागा पकडून सारोळा प्राथमिक शाळेने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अनोखा प्रवेशोत्सव साजरा केला. या उपक्रमाची जामखेड तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
सारोळा प्राथमिक शाळेत दाखल झालेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची शाळेच्या पहिल्या दिवशी सजवलेल्या बैलगाडीसह घोड्यावर बसवून वाजत गाजत गावातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. शाळेने आयोजित केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे चिमुकले बालगोपाल आनंदून गेले होते.त्यांच्या चेहर्यांवरून ओसांडून वाहणारा आनंद खूप काही सांगून जाणारा ठरला.जोशपूर्ण वातावरणात पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रवेशोत्सवाच्या या उपक्रमाला गावकऱ्यांनी आणि पालकांनी मोठी दाद दिली.
सारोळा हे गाव नेहमी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत आले आहे. येथील शाळेत यंदाच्या 2023-24 शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बैल गाडीतून व घोड्यावर बसून इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नविन मुलांची गावामधून मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर गुलाबपुष्प, गणवेश व पाठ्यपुस्तक देऊन इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे शाळेत जंगी स्वागत करण्यात आले.त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थांना स्वादिष्ट व रुचकर गोड जेवण देऊन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस साजरा करण्यात आला. सारोळा प्राथमिक शाळेने राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाची तालुक्यात चर्चा रंगली आहे.
यावेळी सरपंच अजय काशिद, माजी सरपंच हरिभाऊ खवळे,ग्रामपंचायत सदस्य किरण मुळे, बापूराव तांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर सातपुते, SMC माजी उपाध्यक्ष देविदास पवार, शाळेतील शिक्षक सोळंके सर, होळकर सर,श्रीम.रसाळ मॅडम सर्व पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
सारोळा शाळेत नव्या शिक्षकांचे स्वागत
जिल्हाअंतर्गत बदलीने सारोळा शाळेत नव्याने हजर झालेले शिक्षक शहाजी जगताप माजिद शेख व श्रीम.शबाना शेख मॅडम यांचे शाळेच्या व गावच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.