Jamkhed News | स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही गावाला रस्त्याची प्रतीक्षा, नागरिकांची होतेय ससेहोलपट

नागरिकांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Jamkhed News | जामखेड तालुक्यातील खर्डा रोडवर ६०० लोकवस्ती असलेले डोळेवाडी गाव स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही पक्क्या रस्त्यापासून वंचित आहे. नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधीशी अनेकवेळा पत्रव्यवहार केल्यानंतरही याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे येथील नागरिकांचे, विद्यार्थ्यांचे आणि व्यापारी वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. प्रत्येक पंचवार्षिक आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आश्वासनाची बोळवण होत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

डोळेवाडी गाव जामखेड-खर्डा रोडवर २ किमी आत असून येथे जाण्यासाठी मोरेवस्ती मार्गे कच्चा रास्ता आहे.  या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे असून नागरिकांना या खड्ड्यातून मार्ग काढत पक्का रास्ता गाठावा लागतो. तर पावसाळ्यात गावात जाण्यासाठी आपली वाहने शेजारील राजुरी गावात लावून दोन किमी अंतराचा प्रवास चिखलातून वाट काढत करावा लागतो.

डोळेवाडी सोबतच मोरेवस्तीच्या नागरिकांनाही हा त्रास भोगावा लागत आहे. याबद्दल नागरिकांनी अनेकवेळा संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींना तक्रार अर्ज दाखल करून आपली व्यथा मांडली तरीदेखील अद्याप याची कोणीही दखल घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष दिसून येत असून प्रशासकीय पातळीवर तातडीने  रस्त्याची मंजुरी करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे .

चिखलातून वाट शोधण्यात लागली शिक्षणाची ‘वाट’

गावात चौथीपर्यंत शिक्षणाची सोय असून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शेजारील राजुरी गावात किंवा जामखेडला जावे लागते. गावात चौथी पुढील साधारण ७० विद्यार्थी असून याना डोळेवाडी ते राजुरी असा दोन किमीची पायपीट करावी लागते. एरव्ही हा प्रवास खड्ड्यातून वाट काढणारा असला तरी पावसाळ्यात बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते.

Jamkhed News,Even after 75 years of independence, Dolewadi is still waiting for the road
जामखेड तालुक्यातील डोळेवाडी गावाला जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरावस्था

रस्त्याअभावी एसटीचा ‘नकार’

गावातून तालुक्याचे ठिकाण १० किलोमीटरचे असून प्रवासाची साधने उपलब्ध नसल्याने गावातील वृद्ध नागरिक, शेतकरी व दूध उत्पादक शेकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. यामुळे काहीजणांनी पुढाकार घेऊन जामखेड आगाराकडे ‘एसटी’ची मागणी केली होती. यावर एसटीने अंमलबजावणी करत ‘ट्रायल बेस’वर एसटी सुरु केली होती मात्र रस्त्यांची अवस्था पाहून एसटीने आपली सुविधा महिन्याच्या आत गुंडाळली.

Jamkhed News, Even after 75 years of independence, Dolewadi is still waiting for the road
जामखेड तालुक्यातील डोळेवाडी गावाला जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरावस्था

गर्भवती व गंभीर स्वरूपातील रुग्णांचे होतात हाल

पावसाळ्यामध्ये डोळेवाडी ते राजुरी रास्ता पायी चिखल तुडवत वाट काढावी लागते. रस्त्या अभावी दुचाकी, चारचाकी वाहन चिखलातून घेऊन जाणे म्हणजे मोठे दिव्य पार करण्यासारखे आहे. दुचाकी धारकांना धोका पत्कारून पाणी, खड्डे, चिखलातून वाट काढून मार्गक्रमण करावे लागते. अनेक वेळा येथील गरोदर मातांना किंवा आजारी व्यक्तींना दवाखान्यात वेळेवर पोहचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. तसेच अनेकवेळा येथील चिखल आणि खड्ड्यामुळे अपघात घडून आले आहेत.

 

news by vijay dole 

 

web titel :  Jamkhed News | Even after 75 years of independence, Dolewadi is still waiting for the road