jamkhed News : हळगाव कृषि महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी जाणून घेतल्या ग्रामस्थांच्या समस्या, गटचर्चेद्वारे साधला संवाद !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : jamkhed News : गटचर्चा व प्रामुख्याने गावकऱ्यांचा त्यातिल सक्रिय सहभाग ही गावाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाची बाब आहे. गटचर्चेच्या माध्यमातून अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा करता येते, गावकऱ्यांच्या महत्वाच्या समस्या, गरजा ओळखून त्यांची पूर्तता करण्यासंदर्भात उपाय जाणून घेण्यात येतात. गाव विकासाचे हेच व्यासपीठ ओळखून सावरगाव (मा.) येथे ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नुकताच दाखल झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयातील (म.फु.कृ.वि, राहूरी) कृषिदूतांकडून कृषि विस्तार शिक्षण विषयाअंतर्गत गावकऱ्यांच्या महत्वाच्या गरजांवर गटचर्चेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कृषिदूत प्रथमेश क्षीरसागर, रोहित लोहकरे, आदित्य नरवडे, शुभम पवार, आकाश पिंपळे, गुणवंत साबळे, तुषार सरडे यांनी गावकऱ्यांसोबत त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कृषि विषयक समस्या, गरजा जाणून घेतल्या व त्यांची पूर्तता करण्यासंदर्भात उपाय जाणून घेतले.
गावामध्ये बामनधरा आणि ढवळधरा हे दोन महत्वाचे तलाव असून डोंगरावरून वाहून येणारे पाणी यामध्ये साठते, पण ते दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी तलावाचे नूतनीकरण करून जमिनीत पाणी जिरण्याचे आणि पाझरण्याचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. गावाला नदी नसून दोन ओढे आहेत. या ओढ्यांचे पाणी साठवून धरल्यास मे- जून मध्ये पाण्याच्या टंचाईवर मात करता येऊ शकते. गावातील बससेवा बंद असल्यामुळे खासगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. प्रवास सुखद होण्यासाठी बससेवा नियमित चालू करणे आवश्यक आहे.
गावच्या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने सतत पिकांना सिंचन करावे लागते. गावाकडे येण्याचा रस्ता खराब झाल्यामुळे पावसाळ्यात अडचणींचा सामना करावा लागतो. प्राथमिक आरोग्य केंद्राचा अभाव असल्याने जामखेड व बाजूच्या गावाला उपचारासाठी जावे लागते. ज्वारी हे मुख्य पीक असून चिटका या रोगाच्या मोठया प्रादुर्भावामूळे उत्पादनात घट दिसून येते, असे अनेक मुद्दे गावकऱ्यांकडून गटचर्चेत मांडण्यात आले व त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थमंडळी उपस्थित होते. ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाबद्दल कृषिदूतांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ. गोरक्ष ससाणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. सखेचंद अनारसे, केंद्र प्रमुख डॉ. दत्तात्रय सोनवणे, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. नजीर तांबोळी, कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश लांडे व विषय विशेषतज्ञ कृषि विस्तार डॉ. प्रणाली ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.