जामखेड : राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदाराविरुद्ध पाटोदा ग्रामस्थ आक्रमक, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार – दिनकर टापरे यांचा इशारा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। 21 ऑक्टोबर 2022 । जामखेड तालुक्यातील पाटोदा येथील भवर नदीवरील तात्पुरता पुल सातत्याने वाहून जात असल्याने जामखेड – श्रीगोंदा या मार्गावरील वाहतूक सातत्याने बंद पडत आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पाटोदा ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे.
नागरिक जीव धोक्यात घालून वाहून गेलेल्या पुलावरून वाहतुक करत आहेत. वैतागलेले नागरीक आता आक्रमक झाले आहेत. संबंधित ठेकेदारावर कारवाई करून पुलाची तातडीने उभारणी न झाल्यास तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष दिनकर टापरे यांनी दिला आहे.
जामखेड तालुक्यातील पाटोदा येथून बीड आणि पुण्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. या मार्गावरील आढळगाव ते जामखेड या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग योजनेतून काम सुरू आहे. त्यानुसार पाटोद्यातील भवर नदीवरील जुना पुल पाडून नवा पुल उभारला जात आहे. या पुलाच्या उभारणीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये यासाठी ठेकेदार कंपनीने बायपास रस्ता आणि तात्पुरता पुल उभारला होता. मात्र हा पुल नदीला पुर आल्याने तीनदा वाहून गेला आहे.
भवर नदीला पुर येऊन पुल वाहून जात असल्याने पाटोदा ग्रामस्थासह जामखेड- श्रीगोंदा मार्गावरील प्रवाश्यांची प्रचंड हाल होत असल्याने भाजपा नेते आमदार प्रा राम शिंदे यांनी संबंधित ठेकेदाराला तात्पुरता पुल दर्जेदार बनवण्याच्या सुचना दिल्या होत्या, त्यानुसार रस्ता आणि पुलाचे काम ठेकेदाराने केले. पण 20 रोजी हा पूल पुन्हा वाहून गेला. मागील महिन्याभरापासून तिसऱ्यांदा अशी घटना घडली आहे.
संबंधित ठेकेदाराने तात्पुरता पुल उभारताना जुन्या नळ्या टाकल्या होत्या. त्या नळ्यांना पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तडे जाऊन, खालून पुल खचत आहे. त्यामुळे पुल वाहून जात असल्याचे ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष दिनकर टापरे यांनी जामखेड टाइम्सशी बोलताना सांगितले.
दरम्यान, सातत्याने पुल वाहून जात असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. गावात कोणाला अचानक मेडिकल एमर्जन्सी आल्यास उपचारासाठी वेळेत दाखल करण्यास अडचणी येत आहेत. गावातील दोन ते तीन रुग्णांना वेळेत अश्या अडचणींना तोंड द्यावे लागल्याचे टापरे म्हणाले.
पुण्याहून बीडकडे जाणारा जामखेड – श्रीगोंदा हा रस्ता जामखेड तालुक्यातील महत्वाचा मार्ग आहे. सध्या दिवाळी सुरू असल्याने पुण्या – मुंबईहून सणासुदीसाठी गावी परतणाऱ्या नोकरदार वर्ग किंवा शिक्षणासाठी बाहेर असणारी मुले किंवा सणासुदीचे खरेदीसाठी जाणारे शेतकरी वर्ग यांना फार त्रास होत आहे. या सर्व गोष्टींमुळे संबंधित ठेकेदाराविरुद्ध जनतेत संतापाची लाट उसळली आहे.
संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी यासाठी पाटोदा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. संबंधित ठेकेदारावर कारवाई होण्याबरोबरच भवर नदीवर नव्या नळ्या टाकून तातडीने मोठा पुल न उभारल्यास पाटोदा ग्रामस्थासह तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा पाटोद्याचे ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष दिनकर टापरे यांनी दिला आहे.
आमदार राम शिंदे यांनी पाटोदा ग्रामस्थांचे सुरु असलेले हाल दुर करून संबंधित ठेकेदाराला वठणीवर आणण्याची आवश्यकता आहे. आता राम शिंदे हे संबंधित ठेकेदाराविरुद्ध काय ॲक्शन घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.