जामखेड : आली भूरभूर.. गेली भूरभूर.. माना टाकणाऱ्या पिकांना सलाईनचा रिमझिम डोस, जलसाठे कोरडेठाक, जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ऑगस्ट महिना उजाडत आला तरी जामखेड तालुक्याकडे दमदार पावसाने पाठ फिरवली आहे.अधून मधून बरसणार्या हलक्या सरींवर अल्पप्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून आली भूरभूर.. गेली भूरभूर.. असा लपंडाव सुरु आहे.जून आणि जूलै या दोन्ही महिन्यात पावसाने पाठ फिरवलीय.अधून मधून कोसळणाऱ्या औटघटकेच्या पावसामुळे माना टाकू पाहणाऱ्या पिकांना सलाईन मिळत आहे. जामखेड तालुक्याला अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. तालुक्यातील बहुतांश सर्व जलसाठे कोरडेठाक आहेत. जामखेड तालुक्यातील खरिप हंगाम 2023 वाया गेल्यात जमा आहे.
दुष्काळग्रस्त तालुका अशी ओळख असलेल्या जामखेड तालुक्याकडे यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. जून व जूलै महिन्यात पावसाने जेमतेम हजेरी लावली.यामुळे यंदा खरिप पेरण्यांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. तालुक्यात 50 ते 55 टक्क्यांच्या आसपास पेरण्या झाल्या आहेत. यंदा दमदार पाऊस नसल्याने उगवून आलेल्या पिकांना जगवायचे कसे ही चिंता शेतकऱ्यांना सतावत असतानाच, मागील आठवड्यात एक दिवस रात्रभर भीज पाऊस झाला.त्यामुळे माना टाकणाऱ्या पिकांना काहीसे जीवदान मिळाले.परंतू गेल्या तीन चार दिवसांपासून पुन्हा पावसाने हुलकावणी दिलीय. अधून मधून काही मिनिटांच्या हलक्या सरी कोसळत आहेत. यातून पिकांना सलाईनचा डोस मिळत आहे.
जामखेड तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झालाय. सर्वात कमी पाऊस अरणगाव सर्कलमध्ये पडलाय. यंदा पाऊस कमी झाल्याने खरिप क्षेत्रात मोठी घट झालीय. महाराष्ट्रातील बहुतांश भागांना पाऊस अक्षरश: झोडपून काढत आहे.अनेक भागात पूरस्थिती आहे.मात्र जामखेड तालुक्यातून दमदार पाऊस गायब आहे. आकाशात ढगांची दाटी..जोरदार वारे..अन चिंताग्रस्त शेतकरी अशी स्थिती सर्वत्र दिसून येत आहे. स्थानिक वातावरण तयार होऊन काही भागांत पाऊस होतोय, पण तोही रिमझिम अन् काही मिनिटांचा, एकुणच ऑगस्ट महिना उजाडत आला तरी जामखेड तालुक्यात दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील नद्या- नाले, तलाव, धरण कोरडे आहेत.
जामखेड तालुक्यात दमदार पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. खरिप हंगाम तर वाया गेलाच आहे. पण अगामी रब्बी हंगामाचं काय होणार याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. दमदार पाऊस न झाल्यामुळे आहे ती पिके व फळबागा कश्या जगवायच्या यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. अगामी ऑगस्ट महिन्यात तालुक्यात दमदार पाऊस न झाल्यास यंदा तालुकावासियांना दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागणार तर नाही ना? अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.
एक रूपयात पिक विमा
सरकारने एक रूपयांत पिक विमा ही योजना सुरु केली आहे. या योजनेचा जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, पीक विमा भरताना कोणी जर जास्त पैश्यांची मागणी करत असेल तर त्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी यांना तक्रारी कराव्यात.