जामखेड आगाराच्या गलथान कारभारामुळे 50 विद्यार्थिनींना अंधारात करावी लागली पायपीट, विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात, मुजोर अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : एसटी महामंडळाच्या जामखेड आगाराचे वेळापत्रक सातत्याने कोलमडत आहे. ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक बसेस उशिरा धावत आहेत. याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. बसेस उशिरा येत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक तास ताटकळत थांबावे लागत आहे. काही भागात बसेस उशिरा जात किंवा बस येत नसल्याने विद्यार्थ्यांना अंधारात पायी घर गाठावे लागत आहे. असाच प्रकार नुकताच साकत मधून समोर आला आहे.
ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी, गळतीचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने पाचवी ते १२वीपर्यंतच्या मुलींना एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या चांगल्या निर्णयाचा जामखेड आगाराच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थीनींना फटका बसत आहे. अनेक भागात उशिरा बसेस धावत आहेत. काही भागात बसच जात नाही. यामुळे विद्यार्थ्यांना विशेषता: मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात गुरुवारपासून (ता. १५) झाली आहे. ग्रामीण भागातील मुलींना शाळेत ये-जा करण्याची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोफत पास देण्याची सोय केली आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना हा लाभ मिळतो. जामखेड आगाराच्या बसेस ग्रामीण भागात धावतात त्याचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना होतो. मात्र यंदाचे शैक्षणिक सत्र सुरु होताच जामखेड आगाराच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. अनेक भागात वेळेवर बसेस जात नसल्याने एसटी पास अजूनही विद्यार्थ्यांना पायीच घर गाठावे लागत आहे.
जामखेड तालुक्यातील साकत येथे गुरुवार, शुक्रवार, शनिवार बसच नव्हती सोमवारी सकाळची बस आली मात्र ती सायंकाळी आली नाही. तसे मंगळवारी सकाळी बस आली, परंतू सायंकाळी ती बस आली नाही. सायंकाळी चार वाजल्यापासून श्री साकेश्वर विद्यालयातील पन्नास मुली या बसची वाट पाहत बसल्या होत्या. तीन चार तास बसची वाट पाहून बस न आल्याने मुलींना तीन चार किलोमीटर अंतर पायी जात घर गाठावे लागले. अंधारात घरी जाण्याची वेळ येथील विद्यार्थिनींवर आली.
जामखेड एसटी महामंडळाचे डेपो मॅनेजर प्रमोद जगताप यांच्याशी संपर्क साधला असता बस येईल म्हणून सांगितले व फोन बंद केला. यानंतर वाहतूक नियंत्रण थोरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले बस सुटली आहे. एक तास झाले तरी बस येत नाही म्हटल्यावर परत फोन केला तर ते म्हणाले बस येईल. मग वाहक चालक यांचा फोन नंबर द्या म्हटल्यावर फोन नंबर दिला पण त्या वाहक चालकाची ड्युटी दुसरीकडेच होती परत फोन लावला तर थोरात यांनी फोन बंद केला.
शेवटी सहा वाजले तरी बस येत नाही म्हटल्यावर शेवटी सुमारे पन्नास विद्यार्थ्यांना अंधारात चाचपडत पायीच घरी जावे लागले. जामखेड एसटी महामंडळाच्या गलथान कारभाराचा विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुलींना रात्री अंधारात घरी जावे लागत आहे. यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही विपरीत घटना घडल्यास जामखेड आगार याची जबाबदारी घेणार का ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
जामखेड आगारात मुजोर अधिकाऱ्यांचा भरणा आहे. समस्या सोडवण्याऐवजी फोन बंद करून जबाबदारीपासून पळ काढण्यात येथील अधिकारी कर्मचारी धन्यता मानत आहेत.अश्या मुजोर आणि कामचुकार अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता आहे.
तसेच वाहतूक नियंत्रक कक्षातील फोन बंद असतो. अधिकारी खरी माहिती देत नाहीत.बस येणार नसली तरी अधिकारी बस येईल म्हणून सांगतात. काही वेळा बस नादुरुस्तीचे कारण देऊन वेळ मारून नेली जाते. जामखेड आगाराच्या या गलथान कारभाराचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे. साकत भागात नियमित बस सुरू करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा साकत, पिंपळवाडी, कडभनवाडी ग्रामस्थांनी दिला आहे.