जामखेड : चिखलातून वाट काढता काढता ग्रामस्थ बेहाल, दोन आमदार असुन होईना फायदा, घुगेवस्तीकरांना कोण देणार न्याय ?
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । सध्या परतीचा पाऊस जोरदार धुमाकूळ घालताना दिसत आहे. या पावसामुळे मुख्य रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. वाड्या वस्त्यांवर जाणाऱ्या रस्त्यांचे तर सोयच विचारूच नका. चिखलातून वाट काढत जाणारे विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्या नशीब आलेल्या जीवघेण्या संघर्षाकडे कोणाचे लक्ष नाही. दोन आमदार असुनही काहीच फायदा होत नसल्याचा सुर ग्रामस्थांमधून निघत आहे.
ही गोष्ट आहे, चिखलातून वाट काढत रोजचे जीवन जगणाऱ्या घुगेवस्तीची.साधारणतः 150 ते 200 लोकसंख्या असलेली घुगेवस्ती जामखेड तालुक्यातील आनंदवाडी ग्रामपंचायत हद्दीत वसली आहे. जामखेड- खर्डा मार्गापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वसलेल्या घुगे वस्ती रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था झालेली आहे.
एक किलोमीटरचा रस्ता आणि पुल व्हावा यासाठी येथील नागरिकांनी आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, आजवर यावर काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे नागरिकांना रोज चिखल तुडवत ये – जा करावी लागत आहे.
घुगेवस्ती दुध धंद्यासाठी ओळखली जाते.रोज दुध घालण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी बांधवांना चिखलातून वाट काढावी लागते.त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळा गाठावी लागते. रस्ता व्हावा यासाठी अनेकदा लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात आला पण अजूनही या गंभीर समस्येकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.
यामुळे दरवर्षी पावसाळा आला रे आला की घुगेवस्तीवरील नागरिकांचा चिखलातून वाट काढत दळणवळण करण्यासाठीचा संघर्ष ठरलेला आहे.
दरम्यान, रस्त्याच्या प्रश्नांवर कोणाचेच लक्ष जात नसल्यामुळे घुगेवस्तीवरील लोकांनी दोन-तीन वेळेस लोक वर्गणी करून रस्त्यावर मुरूम टाकला तसेच भारत होडशिळ यांनी स्वतः स्वखर्चाने पुलाचे दोन पाईप टाकले.पण कायमचा पक्का रस्ता व्हावा यासाठी नागरिकांचा संघर्ष सुरू आहे.
तालुक्याला दोन आमदार असून सुद्धा आमची बिकट अवस्था आहे, आम्हाला लवकरात लवकर रस्ता व सीडीवर्क पूल मंजूर करून द्यावा. जर रस्ता व पूल मिळाला नाही तर आम्ही दोन्ही आमदारांना आनंदवाडीमध्ये येऊ देणार नाहीत. तसेच प्रशासनाने लक्ष घालून आम्हाला जाण्या येण्याची सोय करावी. नाहीतर आम्ही रस्ता रोको अंदोलन करणार आहोत, असा इशारा आनंदवाडी ग्रामपंचायतचे सदस्य भारत होडशिळ यांनी दिला आहे.