जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे संत शिरोमणी श्री सावता महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पुण्यतिथी निमित्ता अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची उत्साहात सांगता झाली.
संत सावता महाराजांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात आली होती. यामध्ये जि.प.प्राथमिक शाळा व श्री.आणखेरी देवी विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या उत्साहात या सोहळ्यात सहभाग नोंदवला.टाळ मृदूंगाचा गजर,हरिनामाचा जयघोष, भजन गात, घोडे व झेंडे नाचवत, सावता महाराजांचा जयजयकार करत फक्राबाद व पंचक्रोशीतील भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते.
सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह.भ.प. अशोक महाराज भाकरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी परंपरेनुसार भारुडे झाली त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.
फक्राबाद पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांची यावेळी मोठी उपस्थिती होती. अखंड हरीनाम सप्ताह उत्साहात पार पाडण्यासाठी क्रांतिसुर्य ग्रुप फक्राबाद व फक्राबाद ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.