खर्डा, दि, 25 एप्रिल । जामखेड टाईम्स वृत्तसेवा । कडब्याने भरलेल्या ट्रकने अचानक पेट घेतल्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी पळापळ झाली.ट्रक ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला मोकळ्या मैदानात नेल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र भीषण आगीत कडब्याच्या ट्रकसह कडबा जळून खाक झाला. ही घटना आज रात्री शिर्डी – हैदराबाद महामार्गावरील खर्डा शहरात घडली. (Kadaba’s truck caught fire Incidents in Kharda)
श्रीरामपूर येथील प्रभात डेअरीसाठी जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातून कडबा घेऊन निघालेल्या MH 16 AE 5600 या कडब्याच्या ट्रकने खर्डा शहरातील वडारवस्ती जवळ अचानक पेट घेतला. यावेळी परिसरातील नागरिकांनी ट्रक पेटला असल्याची बाब आरडाओरडा करून ड्रायव्हरच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवत पेटलेली ट्रक नागरी वस्तीपासून लांब घेऊन जात एका मोकळ्या मैदानात थांबवली.
यावेळी अनिल बिल्डर सुरवसे, संतोष लष्करे व राजकुमार आजबे यांनी आपल्या बोअरवेल द्वारे पेटलेला ट्रक विझवण्याचा प्रयत्न केला.परंतु सुटलेल्या वार्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी नागेश रणभोर, विकास डोके, इरफान शेख, घनशाम भोसले ,रमेश मदने, नितीन आहेर ,नीलेश आहेर, रतन डोके, राजकुमार तेवर ,प्रविन धोत्रे, काळू पवार, विकास डोके यांच्यासह शहरातील तरुणांनी शेजारी पडलेल्या बांधकामाचे लाकडे उचलून गाडीतील पेटता कडबा जमिनीवर ढकलून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याबरोबरच गावातील अनेक नागरिक माती व पाणी फेकाताना दिसून आले. मात्र या आगीत सदरचा ट्रक जळून खाक झाला.
दरम्यान कडब्याचा ट्रक पेटल्यामुळे शिर्डी हैदराबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सदर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला ट्रक पारनेर तालुक्यातील सुपा येथील हनुमंत नागरे यांचा आहे. सदर ट्रकला आग कश्यामुळे लागले याचे कारण समजू शकले नाही. या घटनेत 30 हजार रूपये किमतीचा कडबा जळून खाक झाला आहे.