जामखेड : अहमदनगर दक्षिणेत बिबट्याचा संसार वाढला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण, जातेगाव परिसरात वनविभागाने लावला पिंजरा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : सत्तार शेख । अहमदनगर दक्षिणेत बिबट्यांचा संसार वाढल्याचे दिसून येत आहे. कोरोना महामारी नंतर बालाघाटाच्या डोंगर रांगेच्या प्रदेशात बिबट्याचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागले आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघासह शेजारील आष्टी, पाथर्डी, नगर, भूम तालुका या भागात बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. पाळीव जनावरे व मानवावर हल्ले होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.

जामखेड तालुक्यातील जातेगाव परिसरात गेल्या आठवड्यात चार बिबट्यांचे दर्शन झाले होते. हा परिसर बालाघाट डोंगर रांगेत येतो. याच भागात जनावरांसह शेळ्यांवर बिबट्यांनी हल्ला केला आहे. बिबट्यांनी गेल्या वर्षी नायगाव भागात धुडगूस घातला होता. खर्डा भागातही बिबटे दिसले होते. धामणगाव येथील वनविभागाच्या जंगलात एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. जामखेड तालुक्यात बिबट्याचे अस्तित्व असल्याचेच या घटनेतून अधोरेखित झाले होते.

मागील चार पाच दिवसांपुर्वी जामखेड तालुक्यातील जातेगाव घाट व याच भागातील भूम हद्दीत बिबट्याचे दर्शन झाले आहे. जातेगाव ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार वनविभागाने जातेगाव परिसरात शुक्रवारी रात्री पिंजरा लावला आहे, हा पिंजरा जामखेड व भूम सरहद्दीवर लावण्यात आला आहे, अशी माहिती कर्जत-जामखेडचे वन परिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी दिली.

कर्जत तालुक्यातही अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. एका घटनेत शेतकऱ्यांवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला होता. दैव बलवत्तर म्हणून शेतकऱ्याचे प्राण वाचले. कर्जत तालुक्यात  बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे. ज्या भागात बिबट्याचे दर्शन होते त्या भागातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. कर्जत तालुक्यात सुमारे 30 ते 40 बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे बोलले जाते. तर कर्जत शेजारील श्रीगोंदा तालुक्यात 100 च्या आसपास बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे बोलले जाते. ऊसपट्ट्यात बिबट्या अधिक सक्रिय आहे.

जामखेड शेजारील आष्टी तालुक्यात बिबट्यांचे सर्वाधिक दर्शन होते. आष्टी तालुक्यातून बालाघाटाची मोठी डोंगरराग गेलेली आहे. या भागात बिबट्याने अधून मधून आक्रमक होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. घरासमोर बांधलेले जनावरे किंवा रानात चरण्यासाठी सोडलेले जनावरे व शेळ्या बिबट्यांकडून लक्ष केले जात आहे.

नगर शहराजवळच्या परिसरात गेल्या पाच सहा महिन्यांपासून बिबट्याचे दर्शन घडत आहे. सोनेवाडी गावात 17 ऑगस्ट 2023 रोजी एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने यात जिवित हानी झाली नाही. पाथर्डी तालुक्यातही अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. नगर तालुक्यातील सोनेवाडी भागात बिबट्या मादी व तिच्या दोन पिल्लांचे नागरिकांना सातत्याने दर्शन घडत आहे.

बिबट्या पकडण्यात वनविभाग ठरतोय अपयशी ?

अहमदनगर दक्षिणेत बिबट्यांचा गेल्या काही वर्षांत संचार वाढला आहे. बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाकडून पिंजरे लावले जातात परंतू, बिबट्या या पिंजर्‍यांना चकवा देण्यात यशस्वी ठरत आहे. बिबट्यांना पकडण्यात वनविभाग अपयशी ठरत असल्याचेच यावरून स्पष्ट होत आहे. बिबट्यांचा मुक्त संचार मानवी वस्त्यांपर्यंत येऊन ठेपला असल्याने जनतेत भीतीचे वातावरण पसरत आहे. दरम्यान जामखेड तालुक्यातील जातेगाव भागात आढळून आलेले बिबटे तातडीने पकडावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नरभक्षक बिबट्याच्या आठवणी अजूनही ताज्या

मागील दोन अडीच वर्षांपुर्वी आष्टी, जामखेड, कर्जत व करमाळा या भागात एका नरभक्षक बिबट्या धुमाकूळ घालत मोठी दहशत पसरवली होती. या नरभक्षक बिबट्याने अनेकांचे प्राण घेतले होते. या नरभक्षक बिबट्याला करमाळा भागात गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. या नरभक्षक बिबट्याने घातलेल्या धुमाकूळाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्यामुळे वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

बिबट्यांसह सहजीवन

कर्जत जामखेड व शेजारील तालुक्यात बिबट्या यापुर्वी सक्रीय नव्हता. परंतू गेल्या काही वर्षांत तो सक्रीय झाला. बिबट्यांसह सहजीवन जगत असलेल्या नागरिकांना त्याची सहसा भीती वाटत नाही. त्याचे दर्शन नित्याचे झाल्याने न घाबरता ते लोक जगत आहेत. परंतू कर्जत-जामखेड भागातील जनतेसाठी बिबट्या हा नवा आहे. मुळात तो हिंस्र प्राणी असल्यामुळे त्याची भीती अधिक आहे. नागरिकांनी वनविभागाने दिलेल्या सुचना पाळणे आवश्यक आहे. नागरिकांनी बिबट्या दिसल्यास थेट वनविभागाला कळवावे. अफवा पसरत असल्यामुळे बिबट्याची जनतेत अधिकच भीती वाढत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. खातरजमा करूनच विश्वास ठेवावा.