जामखेड टाइम्स वृत्तसेवा : संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी हाती घेतलेल्या ऐतिहासिक लढ्याला शुक्रवारी मध्यरात्री मोठे यश आले. सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) अध्यादेश काढला. जरांगे पाटलांनी ऐतिहासिक विजय प्राप्त करताच शनिवारी कर्जतमध्ये (Karjat news) सकल मराठा समाजाने गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. मराठा बांधवांच्या आनंदोत्सवात आमदार प्रा.राम शिंदे (Ram Shinde) यांनी सहभाग घेतला.
मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या. शासनाने अध्यादेश काढला. अध्यादेश आणि इतर शासन निर्णयाच्या प्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सोपवल्या. शनिवारी सकाळी मराठा समाजाची वाशी येथे विजयी सभा पार पडली. तत्पुर्वी मराठा समाजाने ऐतिहासिक विजय मिळवल्याचे वृत्त राज्यभरात धडकताच राज्यातील मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला. शासनाने घेतलेल्या निर्णयाचे कर्जत तालुक्यात मराठा समाजाने जोरदार स्वागत केले.
कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुलालाची उधळण करीत एकमेकांना पेढे भरवत डीजेच्या तालावर मराठा बांधवांनी मराठा आरक्षणाचा आनंदोत्सव साजरा केला. मराठा बांधवांच्या या आनंदोत्सवात आमदार प्रा राम शिंदे यांनी सहभाग होत डीजेच्या तालावर ठेका धरत मराठा आरक्षणाचा आनंदोत्सव साजरा केला.
मनोज जरांगे पाटील यांनी हाती घेतलेल्या अंदोलनास आमदार प्रा.राम शिंदे यांचा सातत्याने पाठिंबा होता. त्यांनी कर्जत-जामखेडमधील पदाधिकाऱ्यांसह अंतरवली सराटी येथे भेट देऊन मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दिला होता. त्यानंतर जरांगे पाटील दोनदा चोंडीला आले होते. या दोन्ही वेळेस आमदार प्रा राम शिंदे यांनी त्यांच्या अंदोलनास सक्रीय पाठिंबा दिला होता.
जामखेड शहरात जरांगे पाटील यांची सभा पार पडली होती. त्या सभेत आमदार शिंदे यांनी सरकारच्या वतीने मराठा समाजाचे निवेदन स्विकारले होते. त्यांनी संपुर्ण सभा सर्वसामान्य जनतेत बसून ऐकली होती. एकुणच मराठा आरक्षणाच्या संपुर्ण लढाईत आमदार प्रा.राम शिंदे यांचा सक्रीय सहभाग राहिला.
महायुती सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या अंदोलनाची दखल घेत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावताच आमदार प्रा राम शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला.कर्जतमध्ये त्यांनी मराठा बांधवांसोबत डिजेच्या तालावर धरलेला ठेका सर्वांचेच लक्ष वेधणारा ठरला आहे. आमदार शिंदे यांनी हटके अंदाजात केलेल्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मतदारसंघात राम शिंदे यांच्या डान्सची जोरदार चर्चा रंगली आहे.
“राज्यात अनेक सरकार आले आणि गेले, पण भाजपा आणि महायुतीच्या सरकारनेच मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न मार्गी लावला आहे. गरजवंत मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याने आज पुन्हा एकदा मार्गी लागला आहे. राज्यात सर्वत्र दिवाळी आणि आनंदोत्सव साजरा होत आहे. आजच्या निर्णयाने पुन्हा एकदा महायुतीच्या गतिमान सरकार आणि वेगवान निर्णयाची अनुभूती राज्याला मिळाली, अशी भावना आमदार प्रा राम शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.”
यावेळी कर्जत सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक विशाल मांडगे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या यशाने समाजास न्याय मिळाला असून गरजवंतासाठी हा सुवर्णक्षण आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत असल्याची प्रतिक्रिया दिली.