Mahsul din 2023 : देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी तरुणांनी मतदानाबाबत जागरूक रहावे – उपविभागीय अधिकारी नितीन पाटील
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : देशाची लोकशाही मजबूत करण्याबरोबरच देशाचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी असे अवाहन उपविभागीय अधिकारी नितीन पाटील (Nitin Patil) यांनी केले.
महसूल सप्ताह 2023 निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव व महसूल विभाग, कर्जत-जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नितीन पाटील बोलत होते.
यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे, नोडल अधिकारी, निवडणूक साक्षरता मंडळ डॉ. मनोज गुड, मंडळ अधिकारी लटके, तलाठी शेख सह आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील विद्यार्थी कल्याण अधिकारी आणि निवडणूक साक्षरता मंडळ यांच्या मार्फत करण्यात आले होते.
यावेळी पार पडलेल्या युवा संवाद कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी विद्यार्थ्यांना महसूल विभागाच्या विविध योजना, शिबिरे, उपक्रमांबद्दल जागरूक केले. तसुच त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी संबंधी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भविष्यात स्पर्धा परीक्षेबरोबरच इतर आवडीच्या क्षेत्रांचा आपल्या करियरसाठी पर्याय निवडावा असा सल्ला पाटील यांनी दिला.
अध्यक्षीय भाषणातून डॉ. ससाणे यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी करून आपला महत्वाचा हक्क बजाविण्याचे आवाहन केले. विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ सखेचंद अनारसे यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम २०२३-२०२४ अंतर्गत ई-पीक पाहणी हा उपक्रम विद्यार्थ्यांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत यशस्वीरीत्या राबविण्यासंबंधी आश्वासन दिले.
सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी अश्रफअली शेख आणि स्वप्नील ढेकळे यांना उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी अर्ज वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवडणूक साक्षरता मंडळाचे नोडल अधिकारी डॉ. मनोज गुड यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ. प्रणाली ठाकरे व आभारप्रदर्शन प्राध्यापिका अर्चना महाजन यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.