कर्जत जामखेड मतदारसंघात आमदार प्रा.राम शिंदे यांचाच बोलबाला, 9 पैकी 6 ग्रामपंचायतींवर महायुतीचा कब्जा, दोन ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडीची सत्ता !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत-जामखेड मतदारसंघातील 9 ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपकडे 5, अजित पवार गटाकडे 1 तर रोहित पवार गटाकडे अवघी 1 ग्रामपंचायत गेली आहे. जवळा व मतेवाडी या जामखेड तालुक्यातील ग्रामपंचायतीत स्थानिक आघाड्यांनी विजय संपादित केला. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवार यांना कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा नाकारले. तर आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत जनतेने भाजपचे गावकारभारी निवडले आहेत, अशी माहिती कर्जत भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील 9 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान पार पडले होते.आज सोमवारी निकाल घोषित झाले. कर्जत तालुक्यातील 6 ग्रामपंचायती तसेच दोन ग्रामपंचायतीत पोटनिवडणूक पार पडली होती. याचे निकाल आता समोर आले आहेत. यामध्ये खेड ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकावला. सरपंचपदाच्या उमेदवारासह भाजपचे 6 सदस्य निवडून आले. तर रोहित पवार गटाचे 5 सदस्य निवडून आले. औटेवाडी ग्रामपंचायतीतवर महायुतीने कब्जा मिळवला. या ठिकाणी अजित पवार गटाचा सरपंच निवडून आला. तर भाजपचे चार सदस्य निवडून आले. तसेच रोहित पवार गटाला 2 जागांवर समाधान मानावे लागले.
गणेशवाडी ग्रामपंचायत रोहित पवार गटाच्या ताब्यात गेली. या ठिकाणी सरपंच पदाच्या उमेदवारासह सर्व 9 सदस्य निवडून आले. वायसेवाडी ग्रामपंचायतीवर भाजपने कब्जा मिळवला. सरपंचपदाच्या उमेदवारासह 6 जागा भाजपने जिंकल्या तर अवघी एक जागा रोहित पवार गटाला मिळाली.करमणवाडी ग्रामपंचायतमध्ये भाजपने सरपंचपदासह सदस्यपदाच्या 3 जागा जिंकल्या तर अजित पवार गटाने सदस्यपदाच्या 4 जागा जिंकल्या. कुंभेफळ ग्रामपंचायतीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. या ठिकाणी सरपंचपदासह सदस्यपदाच्या 8 जागा भाजपने जिंकल्या तर रोहित पवार गटाला अवघी एक जागा मिळाली आहे, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे यांनी दिली.
कर्जत तालुक्यातील दुधोडी व ताजू – तळवडी या दोन ग्रामपंचायतीत एका एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये दुधोडीत रोहित पवार गटाचा उमेदवार निवडून आला. तर ताजू – तळवडी ग्रामपंचायतीत भाजपचा सदस्य निवडून आला.
कर्जत तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे चार गावांमध्ये सरपंच निवडून आले. अजित पवार गटाचा एका गावात सरपंच झाला तर रोहित पवार गटाचा एका गावात सरपंच झाला. तर कर्जत तालुक्यात भाजपचे 28 ग्रामपंचायत सदस्य निवडून आले. तर अजित पवार गटाचे चार सदस्य निवडून आले. रोहित पवार गटाचे 19 सदस्य निवडून आले.
जामखेड तालुक्यात जवळा, मतेवाडी व मुंजेवाडी या तीन ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून भाजपने मुंजेवाडी ग्रामपंचायतीत एकहाती वर्चस्व मिळवले. जवळा व मतेवाडी या दोन ग्रामपंचायतीत स्थानिक आघाड्यांनी विजय मिळवला. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीत असलेल्या जवळा व मतेवाडीतील विजयी पॅनलने आपली राजकीय भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.
जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विजय झाला असून जनतेने जवळा ग्रामविकास पॅनलच्या हाती ग्रामपंचायतची सत्ता सोपवली आहे. आजच्या विजयात कुठल्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही. जवळा गावातील सर्वसामान्य जनतेने धनशक्तीला पराभूत करत जनशक्तीने आपली ताकद दाखवून दिली आहे. आम्ही पाच वर्षांत केलेल्या विकास कामांना जनतेने साथ दिली अशी पहिली प्रतिक्रिया जवळा ग्रामविकास पॅनलचे नेते प्रशांत शिंदे यांनी विजयानंतर दिली आहे. तर मतेवाडीतील विजयी पॅनलने आपली राजकीय भूमिका जाहिर केली नसल्याने मतेवाडी कोणत्या पक्षाच्या ताब्यात यावर संभ्रम कायम आहे.
एकुणच कर्जत-जामखेड मतदारसंघातील ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रा.राम शिंदे यांच्या गटाचाच बोलबाला असल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. गावपातळीवरील जनता आमदार रोहित पवार यांना वारंवार नाकारत असल्याने दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमांतून कर्जत-जामखेड मतदारसंघात आमदार प्रा.राम शिंदे अर्थात भाजपची (महायुती) राजकीय ताकद वाढत असल्याचे दिसत आहे. आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.