जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । आष्टी तालुक्यात अतिवृष्टी सदृश पाऊस झाल्यामुळे पाटोदा (गरडाचे) येथील भवर नदीला 13 रोजी पुर आला. मागील सहा दिवसांत नदीला सातत्याने मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळे जामखेड- कर्जत – श्रीगोंदा हा प्रमुख मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे. भवर नदीला पुर आल्याची माहिती मिळताच आमदार राम शिंदे तातडीने रात्री उशिरा पाटोद्याकडे धाव घेतली आणि तेथील पुुरपरिस्थितीची पाहणी केली.
जामखेडसह शेजारील आष्टी तालुक्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या पावसामुळे अनेक भागातील नद्या दुथडी भरून वाहत आहे. शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 13 रोजी पावसाने जोरदार बॅटिंग केली. विशेषता: आष्टी तालुक्याला अतिवृष्टी सदृश्य पावसाने झोडपून काढून काढले. या भागातून वाहणाऱ्या भवर नदीला मोठा पुर आला. त्यामुळे पाटोद्यातील भवर नदीवरील पुल पाण्याखाली गेला आहे.
जामखेड – कर्जत – श्रीगोंदा हा जामखेड तालुक्यातील प्रमुख मार्ग आहे. सध्या या मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग योजनेतून आढळगाव ते जामखेड या भागापर्यंत काम सुरु आहे. त्यानुसार पाटोद्यातील भवर नदीवर नव्या पुलाची उभारणी सुरु आहे. तात्पुरत्या वाहतुकीसाठी ठेकेदार कंपनीने बायपास रस्ता व तात्पुरता पुल उभारला होता. पण तो नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून जामखेड तालुक्यातील महत्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.
दरम्यान, 13 रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे भवर नदीला पुर आला. याची माहिती मिळताच आमदार राम शिंदे यांनी तातडीने पाटोद्याकडे धाव घेतली. शिंदे यांनी रात्री उशिरा पाटोद्याला भेट देऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी लहू शिंदे, पाटोद्याचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण सह आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, जामखेड – श्रीगोंदा हा जामखेड तालुक्यातील सर्वात महत्वाचा रस्ता गेल्या सहा दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद आहे. ही गंभीर बाब आहे. म्हणूनच तातडीने रात्री पाटोद्याला भेट दिली. आपत्कालीन परिस्थितीत लोकांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, हा रस्ता तातडीने सुरु झाला पाहिजे. उद्याच्या उद्या हा रस्ता सुरु झाला पाहिजे यासंदर्भात ठेकेदारांना सुचना दिल्या आहेत. हा रस्ता लवकरच सुरु होईल असा दिलासा यावेळी शिंदे यांनी बोलताना दिला.