जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव आयोजित ग्रामीण कृषि जागरुकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मोहा येथे कृषि कृषिदूतांची प्रथम मासिक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सावरगाव (मा.)आणि मोहा या दोन्ही गावचे कृषिदूत उपस्थित होते.
सदर बैठकीत दोन्ही गावांमध्ये शेतकऱ्यांसाठी जानेवारी महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या विविध प्रात्यक्षिकांचा आढावा घेण्यात आला. दोन्ही गावांमधील विद्यार्थ्यांचे गटप्रमुख शुभम पवार व अशरफअली शेख यांनी गावातील शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या प्रात्यक्षिकांचा आढावा सादर केला तसेच गावातील शेतकऱ्यांच्या गरजेनुसार घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकांबद्दल माहिती दिली.
यामध्ये कृषिदूतांनी प्रमुख पिकांमध्ये जैविक पद्धतीने रोग व किड नियंत्रण यासंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. वनस्पती रोग शास्त्र अंतर्गत ज्वारी या पिकाचे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून बीज प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले तसेच बोर्डो मिश्रण तयार करून त्याचा योग्य पद्धतीने वापर कसा करावा याचेही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. मृदा शास्त्र अंतर्गत माती नमुना घेण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
कृषि विस्तार विषया अंतर्गत गावकऱ्यांच्या महत्वाच्या गरजा ओळखून त्यावर उपाय सुचविण्यात आले. उद्यानविद्या विषया अंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवड, खड्डे खोदणे आणि भरणे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. पशुसंवर्धन विषया अंतर्गत स्वच्छ दूध उत्पादन व शास्त्रोक्त पद्धतीने गोठा स्वच्छ करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
कृषि विद्या व कृषि अर्थशास्त्र विषया अंतर्गत शेतकऱ्यांना उपयुक्त अॅपसची माहीती देण्यात आली. अशाप्रकारे विविध विषयांच्या प्रात्यक्षिकांचा आढावा सादर करण्यात आला.सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांनी कृषि विद्यापीठाचे नविन तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कृषिदूतांना सूचित केले.
या मासिक बैठकीसाठी हाळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे, कार्यक्रम समन्वयक व वनस्पतीशास्त्र विषयतज्ञ डॉ. सखेचंद अनारसे, केंद्र प्रमुख डॉ. दत्तात्रय सोनवणे, कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश लांडे, उद्यानविद्या विषयतज्ञ प्रा. अरुण पाळंदे, मृदाशास्त्र विषयतज्ञ डॉ. प्रेरणा भोसले, वनस्पती रोगशास्त्र विषयतज्ञ डॉ. मनोज गुड , कृषि विस्तार विषयतज्ञ डॉ. प्रणाली ठाकरे, पशुसंवर्धन विषयतज्ञ डॉ. निकिता धाडगे, कृषि अर्थशास्त्र विषयतज्ञ डॉ. उत्कर्षा गवारे उपस्थित होते. प्रत्येक विषयतज्ञांनी आपल्या विषयाचा गावांमधील शेतकऱ्यांना कशाप्रकारे फायदा करून देण्यात येईल याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिदूत चंद्रशेखर वाले तर आभार प्रदर्शन कृषिदूत ओंकार दौंड यांनी केले.