जामखेड टाइम्स वृत्तसेवा : माय भारत पोर्टल योजनेअंतर्गत कृषि महाविद्यालयांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हाळगावच्या शासकीय कृषि महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेले एक दिवसीय माय भारत पोर्टल प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सदरचे प्रशिक्षण महात्मा फुले कृषि विद्यापीठातील डॉ. सात्तपा खरबडे (अधिष्ठाता (कृषि), यांच्या निर्देशानुसार व कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

माय भारत पोर्टल प्रशिक्षणासाठी जिल्हा युवा अधिकारी तथा सहाय्यक संचालक नेहरू युवा केंद्र संगठन, नवी दिल्ली संकल्प शुक्ला यांनी मार्गदर्शन केले. शुक्ला यांनी माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. सदर प्रशिक्षणादरम्यान माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्याचे प्रात्यक्षिक त्यांनी दाखवले. कृषि व संलग्न क्षेत्रातील शेतकर्यांच्या समृद्धीसाठी युवकांना माय भारत पोर्टलच्या माध्यमातून कसे सहकार्य करता येईल हे समजावून सांगितले. माय भारत पोर्टलवर आधार आधारित आपल्या इत्यंभूत माहितीसह नोंदणी झाल्यानंतर युवक संपूर्ण देशातील विविध उपक्रमांत भाग घेऊ शकतात अशी माहिती शुक्ला यांनी यावेळी दिली.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रशिक्षण आयोजित करण्यामागचा हेतू समजावून सांगितला. ॲग्री स्टॅक अंतर्गत डीजीटल पीक सर्वेक्षण आणि शेतकरी नोंदणीमध्ये अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी व त्याला व्यापक रूप प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासित केले. यात ७ व्या व ८व्या सत्रातील विद्यार्थ्यांचा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रशिक्षणासाठी विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय सोनावणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विवेकानंद कुलकर्णी,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पोपट पवार, डॉ. प्रेरणा भोसले, डॉ. गोकुळ वामन, प्रा. अरुण पाळंदे, डॉ. नजीर तांबोळी, डॉ. मनोज गुड, डॉ. निलेश लांडे, डॉ. महेश निकम, डॉ. अंबादास मेहेत्रे, अर्चना महाजन, डॉ. उत्कर्षा गवारे, डॉ. प्रणाली ठाकरे, डॉ. किरण चौधरी, डॉ. अनिकेत गायकवाड, महादू शिंदे शिक्षकेतर कर्मचारी संजय आढाव, महेश सुरवसे, संभाजी ठवाळ, सुरेश मकरे, किरण अडसुर, प्रदीप धारेकर उपस्थित होते.
माय भारत पोर्टल संदर्भातील विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन कार्यक्रमाच्या शेवटी करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. उत्कर्षा गवारे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण उत्साहात पार पडले.