जामखेड : जीवन समृद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत श्रमसंस्काराची जोड द्यावी – महावीरसिंग चौहान
जामखेड टाइम्स वृत्तसेवा :राष्ट्रीय सेवा योजना शिबीर विद्यार्थ्यांसाठी मोलाची देणगी आहे. जीवन समृद्ध करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत श्रमसंस्काराची जोड द्यावी, विद्यार्थ्यांनी शिबिराच्या माध्यमांतून जवळा गावातील शेतकरी व नागरिकांमध्ये कृषिविषयक आपुलकी निर्माण करावी त्याचबरोबर विद्यापीठाने विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान पोहचविण्याचे कार्य करावे,असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान यांनी केले.

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयातील तृतीय वर्ष विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराची जवळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात सुरूवात करण्यात आली. २१ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत जवळा येथे सदर पार पडणार आहे.या शिबिरात स्वयंसेवकांमार्फत ग्रामस्वच्छता अभियान, वृक्षारोपण कार्यक्रम, समाज प्रबोधनपर फेरी, योगासने, जल संवर्धन, पर्यावरण जागृती, आरोग्य शिबीर, व्यसनमुक्ती जागरूकता, कृषिविषयक विषयतज्ञांची व्याख्याने असे उपक्रम राबवले जाणार आहेत.शिबिराच्या उदघाट्न प्रसंगी डॉ. चौहान बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डाॅ अनिल काळे होते.

यावेळी हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक देशाच्या सेवेसाठी अभिमानाने 24 तास तत्पर राहतात, हळगाव कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जवळा येथील शिबिराच्या माध्यमांतून शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करून आपल्या महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा.

‘मी नाही पण तू’ या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या ब्रीदवाक्याचे महत्व त्यांनी सांगितले. तसेच कृषि महाविद्यालय, हाळगाव मार्फत जवळा गावात माती आणि पाणी परीक्षण यावर विशेष मोहीम आयोजित करून त्याबद्दल शेतकर्यांमध्ये जनजागृती करण्यात येईल असेही डाॅ काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जवळा गावचे सरपंच सुशील आव्हाड, डॉ. दिपक वाळुंजकर आणि श्री. प्रशांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि या शिबिरासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या शिबिरासाठी डॉ. गोकुळ वामन, डॉ. प्रेरणा भोसले, डॉ. विवेकानंद कुलकर्णी, इतर अधिकारी, कर्मचारी, चंद्रकांत पागीरे, मच्छिंद्र सूळ, रुपचंद आव्हाड, कांतीलाल वाळूंजकर, आर के शिंदे, सागर बोलभट, राजेंद्र महाजन, पुरुषोत्तम वाळुंजकर, सचिन मसतुद व संजय वाळुंजकर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पोपटराव पवार यांनी तर आभारप्रदर्शन कु. हर्षद काकडे यांनी केले. ग्रामस्थ, शेतकरी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिबिराचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला.