रत्नापुरात नवा ट्विस्ट, वारे – मोरे सहमती एक्स्प्रेस रूळावर धावण्याआधीच घसरली, सुर्यकांत मोरेंच्या भूमिकेकडे लागले जामखेड तालुक्याचे लक्ष
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। संपुर्ण जामखेड तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या रत्नापुरात बुधवारी नवा ट्विस्ट आला.अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दत्तात्रय वारे आणि सुर्यकांत मोरे या दोन दिग्गज नेत्यांमध्ये जागा वाटपात एकमत झाले नाही, वारे यांनी जागावाटपात ताठर भूमिका घेत मोरे गटाशी तडजोड केली नाही. मोरे यांचा करेक्ट कार्यक्रम करायचाच या इराद्याने वारे यांनी भूमिका घेतली. यामुळे संतापलेल्या मोरे यांनी अर्ज माघारी घेण्याचा शेवटच्या दिवशी आपल्या सर्व समर्थकांचे अर्ज माघारी घेतले. मोरेंच्या या खेळीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे आणि पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यकांत मोरे हे दोन्ही नेते रत्नापुर गावातील आहेत, त्यामुळे जामखेड तालुक्याच्या राजकारणात रत्नापुर गावाचे महत्व मोठे आहे. रत्नापुर ग्रामपंचायतच्या राजकारणात वारे विरूध्द मोरे असा आजवरचा संघर्ष राहिला आहे. परंतू दोन्ही नेते राष्ट्रवादीत असल्याने स्थानिक राजकारणात दोन्ही नेत्यांनी जुळवून घेण्याची भूमिका घ्यावी व ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावा यासाठी आमदार पवारांनी वारे – मोरे यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या. पण अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपावरून एकमत झाले नाही. जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे रत्नापुरचा राजकारणात आता नवा ट्विस्ट आला आहे. मोरे गटाने या निवडणुकीतून माघार घेतली आहे.
रत्नापुर ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपदासाठी 9 जागा आहेत. तर सरपंचपद जनतेतून निवडले जाणार आहे. या निवडणुकीसाठी 2100 मतदार आहेत. रत्नापुर ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे आणि माजी सभापती सुर्यकांत मोरे या दोन्ही नेत्यांमध्ये सरपंचपदासाठी सुचवलेल्या नावावर शेवटपर्यंत एकमत झाले नाही. वारे यांनी सुचवलेल्या नावावर वारे अडून बसले होते. मात्र, वार्ड क्रमांक 1 मधील उमेदवारी देताना दोन्ही नेत्यांचे एकमत झाले होते.
परंतू, वार्ड क्रमांक 2 आणि 3 मध्ये असलेल्या सहा जागांचे जागावाटप करताना मोरे आणि वारे यांनी तीन – तीन जागा घ्याव्यात अशी भूमिका मोरेंची होती, मात्र जागा वाटपाचा तिढा सुटला नाही, त्यानंतर मोरेंनी दोन जागा घ्याव्यात आणि वारेंनी चार जागा घ्याव्यात असा नवा फॉर्म्यूला समोर आला, त्यावर मोरे राजी होते पण वारेंकडून सहमती आली नाही. अखेरपर्यंत जागा वाटपात एकमत झाले नाही, त्यामुळे चिडलेल्या सुर्यकांत मोरे यांनी त्यांच्यावतीने भरलेले 11 जणांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले. मोरेंच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे आणि माजी सभापती सुर्यकांत मोरे या दोन नेत्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत एकमत होऊन तगडा पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, आणि रत्नापुर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी झेंडा फडकवेल असा सर्वच जण अंदाज व्यक्त करत होते, परंतू वारे यांनी अडेलतट्टू भूमिका घेतल्याने वारे – मोरे सहमती एक्स्प्रेस रूळावर धावण्याआधीच घसरली आहे. रत्नापुरात वारेंना ऐकाकी खिंड लढवावी लागणार आहे. जागा वाटपात मोरे दुखावले गेले आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत सुर्यकांत मोरे यांच्या भूमिकेला मोठे महत्व आले आहे. मोरे या निवडणुकीत काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी त्यांना हवे असलेले सर्व उमेदवार रत्नापुर ग्रामपंचायत निवडणुकीत उतरवले आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठी वारे यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे, जागा वाटपात मोरे गट दुखावला गेला आहे. मोरे गटाची मते निर्णायक आहेत. आता मोरे वारेंचा करेक्ट कार्यक्रम करणार का ? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मोरे गटाच्या खालील उमेदवारांनी घेतली निवडणुकीतून माघार
सरपंचपदाच्या उमेदवार : रतन गोरख राजगुरू,
सदस्यपदाचे उमेदवार : नितीन वैजीनाथ बुचुडे, उद्धव आबासाहेब ढवळे, वारे कानिफ मच्छिंद्र, वारे आनंत महेंद्र, दत्तात्रय अंकुश मोरे, मोरे मंदाकिनी दत्तात्रय, मोरे नानासाहेब रावसाहेब, रुपाली नितीन बुचुटे, मोरे ज्योती नानासाहेब व सुप्रिया सुजित नलावडे या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.