जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेेख । 24 ऑक्टोबर 2022 । आपल्या नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रमांसाठी नेहमी चर्चेत असलेल्या सरपंच प्रशांत शिंदे यांनी यंदाच्या दिवाळीत अनोखी सामाजिक बांधिलकी जपत गावकऱ्यांबरोबर दिवाळी साजरी केली. दिवाळीनिमित्त प्रशांत शिंदे यांनी गावातील 1500 कुटुंबांना दिवाळी फराळ किटचे वाटप केले. दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छि तो तें लाहो । प्राणिजात ॥ या ओळींना सरपंंच प्रशांत शिंदे यांनी खऱ्या अर्थाने कृतिशील करण्याच्या घेतलेल्या भूमिकेचे गावकऱ्यांमधून कौतूक होत आहे.
जवळा गावच्या सरपंचपदाच्या माध्यमांतून शिंदे कुटुंबावर गावकऱ्यांनी दाखवलेल्या विश्वासाचे ऋण व्यक्त करण्यासाठी सरपंच प्रशांत शिंदे यांच्या पुढाकारातून मागील वर्षीपासून दिवाळी निमित्त ‘ऋणानुबंध’ या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमांतून जवळा गावात एक वेगळी चळवळ शिंदे यांनी हाती घेतली आहे. या कार्यक्रमात शिंदे यांनी मागील वर्षी भूमिपुत्र शिक्षकांचा तसेच जवळा आणि परिसरातील पत्रकारांचा सन्मान त्यांनी घडवून आणला होता.
यंदा दिवाळी निमित्त सरपंच प्रशांत शिंदे यांच्या पुढाकारातून जवळा गावातील 1500 कुटुंबांसाठी दिवाळी फराळ किटचे वाटप करण्यात सुरुवात झाली आहे. या उपक्रमाची सुरुवात 24 रोजी जवळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळी करण्यात आली. सण उत्सवात सर्व गावकरी आनंदाने सहभागी व्हावेत, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सरपंच प्रशांत शिंदे म्हणाले.
दिवाळीनिमित्त प्रथमच जामखेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील संपुर्ण गावातील कुटुंबांना दिवाळी फराळ किटचे वाटप करण्याचा पहिला उपक्रम सरपंच प्रशांत शिंदे यांनी जवळा गावात राबवत नवा पायंडा पाडला. गावकारभारी आणि गावकरी यांच्यातील स्नेहाचे नाते वृद्धिंगत करणारा ‘ऋणानुबंध’ हा उपक्रम तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते मुरलीधर अण्णा हजारे, रफिक भाई शेख, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, ग्रामपंचायत सदस्य दयानंद कथले, दीपक देवमाणे, संदीप माने, ज्येष्ठ नेते विष्णू दादा हजारे, भानुदास रोडे गुरुजी, युवासेना नेते सावता हजारे, युवा नेते राहुल पाटील, सुशील आव्हाड, अमोल हजारे, सावता ग्रूप अध्यक्ष प्रमोद कोल्हे, सुभाष आप्पा रोडे, प्रदीप हजारे, राहुल हजारे, मारुती गोरे, दत्ता रोडे, सूरज मोहळकर, शिंदे युवासेना नेते नितीन कोल्हे, व्यापारी नागेश कथले, महेश कथले, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद आव्हाड, तानाजी पवार, यासीनभाई शेख, किसन गोयकर, राम हजारे, जीवन रोडे, विश्वजित हजारे, संदीप कोल्हे, दीपक हजारे, समीर शेख , भाऊसाहेब दळवी तसेच शेतकरी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.