जामखेडकरांनो जागते रहो : जामखेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला (Outbreak of corona started increasing in Jamkhed taluka)
तीन दिवसातील आकडेवारी चिंतेत भर घालणारी
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: जामखेड तालुक्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेने मोठा विध्वंस घडवला. अनेक नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला. ज्या कुटूंबात अश्या दुर्दैवी घटना घडल्या त्यांनाच कोरोनाच्या भीषण दाहकतेच्या झळा भोगाव्या लागल्या. लाखो रुपये खर्चून माणसे जगली नाहीत तर काहींना नीट उपचारही मिळाले नाहीत. जे रूग्ण ऑक्सिजनवर राहून जगले त्यांनी रोज मृत्यू पाहिला. अश्या या भीषण परिस्थितीला सामोरे जाऊनही सध्या जनतेकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांना सर्रासपणे धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र संपुर्ण तालुक्यात आहे.(Outbreak of corona started increasing in Jamkhed taluka)
उद्या शनिवार दिनांक १०/७/२०२१ रोजी कोणत्याही लसीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे जामखेड शहरात लसीकरण होणार नाही अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय वाघ यांनी दिली आहे.
कोरोनाची तिसरी लाट विनाशकारी असु शकते असा कयास तज्ज्ञांकडून वारंवार व्यक्त केला जात आहे. याकडे दुर्लक्ष करून दैनंदिन व्यवहार जोमात सुरू आहेत. विनामास्क फिरणार्यांविरोधात कारवाई होतेय खरी पण अश्या कारवाया करण्याची वेळ प्रशासनावर का आणली जात आहे ? यावर आता जनतेने आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. जनतेने स्वयंशिस्तीचा अवलंब केल्यास आपला तालुका कोरोनामुक्त होऊ शकतो.आरोग्याच्या प्रश्नावर जे कोणी राजकारण करत असतील त्यांनाही वेळीच रोखणे आवश्यक आहे.(Outbreak of corona started increasing in Jamkhed taluka)
गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता कोरोनाने आता आपले अंग झटकण्यास सुरूवात केल्याचे दिसु लागले आहे. मागील दोन दिवसांत तालुक्यात ४३ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील १५ च्या आसपास गावांमध्ये हे नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी जामखेड तालुक्यात ४३ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यानुसार मागील तीन दिवसांतील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ८६ इतकी झाली आहे.
जामखेड तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात ५८४ रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या तर ४५४ नागरिकांचे RTPCR स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत. शुक्रवारी दिवसभरात करण्यात आलेल्या ५८४ रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये जामखेड ०५, साकत ०३, बोरला ०१, धोंडपारगाव ०२, डिसलेवाडी ०७, धोतरी ०१, वाघा ०१, तेलंगशी ०२, खर्डा ०१, देवदैठण ०१, आपटी ०१, वंजारवाडी ०१ अश्या २६ रूग्णांचा समावेश आहे. जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झालेल्या RTPCR तपासणी अहवालात जामखेड ०१, तेलंगशी ०१, खर्डा ०१, राजेवाडी ०५, डिसलेवाडी ०२, फक्राबाद ०१, नायगाव ०१, चुंबळी ०३, जवळा ०२ अश्या १७ रूग्णांचा समावेश आहे. त्यानुसार शुक्रवारी दिवसभरात जामखेड तालुक्यात तब्बल ४३ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डाॅ संजय वाघ यांनी दिली.(Outbreak of corona started increasing in Jamkhed taluka)
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आज जामखेड तहसिल कार्यालयात खाजगी डाॅक्टरांची बैठक पार पडली. या बैठकीत ऑक्सिजनचा साठा वाढवण्यासाठी खाजगी रूग्णालयांकडून काय उपाययोजना राबवल्या जात आहेत याचा आढावा घेण्यात आला. तहसिलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय वाघ सह आदी यावेळी उपस्थित होते.