चक्क..पावसानेच उघडा पाडला नव्या पुलाच्या निकृष्ट कामाचा दर्जा, दोन महिन्यातच नवा पुल कोसळला, दिघोळ माळेवाडीतील घटना
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड तालुक्यात मागील सात ते आठ वर्षांपासून विकास कामांसाठी करोडोंचा निधी येतोय, पण ठेकेदार, नेते, कार्यकर्ते आणि अधिकारी यांच्या भ्रष्ट युतीतून जन्माला आलेली (निकृष्ट) विकास कामे महिना – सहा महिन्यातच उघडी पडत असल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. आता, असेच एक ताजे उदाहरण उजेडात आले आहे. या प्रकरणात ठेकेदाराच्या उत्कृष्ट कामाचा नवा नमुना समोर आला आहे. दोन महिन्यांपूर्वी बांधलेला नवा पुल तुटून गेल्याची घटना जामखेड तालुक्यात घडली आहे.
मराठवाड्याच्या कुशीत वसलेले माळेवाडी हे अहमदनगर जिल्ह्यातील शेवटचे गाव. या गावाला जाण्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून दिघोळ ते माळेेवाडी या साडेतीन किलोमीटर रस्त्यासह पुलाच्या कामासाठी 01 कोटी 94 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता.
या कामातील आमराई ओढ्यावरील पुलाचे काम दोन महिन्यांपूर्वी पुर्ण झाले होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे दिघोळ ते माळवाडी दरम्यान बांधलेला अर्धा पुल अक्षरशः कोसळुन पडल्याची घटना उघडकीस आली आहे. या पुलाचे काम ‘डोंगरे’ नावाच्या ठेकेदाराने केल्याची माहिती समोर येत आहे.
मुख्यमंत्री सडक योजनेतून दिघोळ ते माळेवाडी आमराई ओढ्यावरील जुना पुल तोडुन नवा पुल तयार करण्यात आला होता. मागील दोन महिन्यापुर्वी या पुलाचे काम करण्यात आले होते. परंतू , नुकत्याच झालेल्या पावसाने या पुलाचा दर्जाच उघडा पाडला. पावसामुळे नवा पुल कोसळुन पडला. शिवाय उर्वरित पुलाच्या खालची माती ढासळत असल्याचे दिसत आहे.
नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी तयार केलेला नवा पुल मात्र नागरिकांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे.
दरम्यान या घटनेनंतर दिघोळ – माळेवाडीत संबंधित ठेकेदाराविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. पुलाच्या कामाच्या दर्जाची चौकशी होऊन संबधित ठेकेदारावर कारवाई करण्याची तसेच दुसरा नवा पुल बांधुन देण्याची मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे.
वास्तविक या ठिकाणी मोठ्या व उंच पुलाची गरज आहे. याठिकाणचा मोठा पूल पाडला. सदर कमी उंचीच्या अरूंद पुलाबाबत व कामाच्या दर्जाबाबत दिघोळ गावातील तरुणांनी उपोषण केले होते. राजकीय हस्तक्षेपामुळे तरुणांनी उपोषण मागे घेतले होते. राजकीय पाठबळामुळे ठेकेदारावर कोणाचाही अंकुश नाही. त्यामुळे मनमानी पद्धतीने पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे केले. एवढ्या मोठ्या निधीतून बांधलेला पुल दोनच महिन्यात पडला. पुढील रस्त्याचे कामही केलेले आढळून येत नाही. संबधित ठेकेदार, अधिकारी, इंजिनिअर यांची चौकशी करण्याची गरज आहे.