Ram shinde birthday : सगळ्यांच्या नजरा मुंबईकडे लागल्यात, तुम्ही माझ्याकडे लावा; नक्कीच तुम्हाला काहीतरी आणून दाखवतो – आमदार प्रा.राम शिंदे यांचे सुचक वक्तव्य चर्चेत

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । 1 जानेवारी 2024 : Ram shinde birthday : सुदैवाने आपल्याला चांगले दिवस आहेत. कोणाला संधी मिळाली नाही पण ती मला मिळाली. पक्ष देईल ती जबाबदारी वेगवेगळ्या राज्यात जाऊन पार पाडतोय. त्यामुळे समजून घ्या काय चाललयं ते. अशी जागा धरायची कोणी उठं म्हटलं नाही पाहिजे. अशी जागा तयार करायची लोकं म्हणली पाहिजेत ह्या जागेवर ह्योच जाऊ शकतो. अशी परिस्थिती निर्माण केलीय. महाराष्ट्रात काही व्हायचं म्हणलं की आपलं नाव टिव्हीवर आधी येतं. 2024 वर्ष सुरू होत आहे. सगळ्यांच्या नजरा मुंबईकडे लागल्यात. तुम्ही माझ्याकडे लावा. नक्कीच काहीतरी आणून दाखवतो तुम्हाला, असे सुचक वक्तव्य आमदार प्रा राम शिंदे यांनी हळगाव येथे बोलताना केले.

Ram Shinde birthday news, All eyes are on Mumbai; You put it to me; Surely brings you something - MLA Prof. Ram Shinde's suggestive statement in the discussion

आमदार प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठ्या उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढदिवसानिमित्त गावोगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी जामखेड तालुक्यातील हळगाव, बावी, खांडवी, जामखेड,  रत्नापुर, पाटोदा, डोणगाव या ठिकाणी आमदार प्रा राम शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. 31 डिसेंबर 2023 रोजी आमदार प्रा.राम शिंदे यांच्या दौर्‍याची सुरुवात हळगाव येथून झाली. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला.

हळगावमध्ये बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, येणाऱ्या येणाऱ्या कालखंडामध्ये कोणाच्या नादाला लागू नका. भूलथापांना बळी पडू नका. मागच्यावेळी नादंवादं लागून जी चुक केली ती पुन्हा करू नका, आता आपलाच नाद करा. आपल्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, या भागातल्या, परिसरातल्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या माझ्या एवढ्या कोणालाच माहित नाहीत. त्या मी सोडवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या भागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्व मुलभूत सुविधा प्राप्त झाल्या पाहिजेत. यासाठी आजवर प्रामाणिक प्रयत्न केले. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात आनंद आला पाहिजे. प्रगती झाली पाहिजे. त्यादृष्टीने माझा नेहमी प्रयत्न असतो. तुमचे आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे आहेत. यापुढेही कायम ठेवा. त्याला तडा जाऊ देणार नाही, असे आमदार राम शिंदे म्हणाले.

माझा वाढदिवस हा उत्सवच झालाय, कारण सर्वसामान्य माणसामध्ये आपल्या संदर्भात असलेल्या भावना यानिमित्ताने प्रकट होताना दिसत आहेत. आठ दिवस गडी कामाला लावायचे आणि बायका पोरं घेऊन परदेशात जायचं असं मी काही करत नाही. मतदारसंघातील जनतेत राहूनच मी माझा वाढदिवस नेहमी साजरा करत असतो, असे म्हणत आमदार शिंदे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला.

बावी गावात बोलताना आमदार प्रा. राम शिंदे म्हणाले की, कोरडवाहू प्रकल्पात बावी गावाची निवड झाली होती. पण 10 वर्षे गावाला कुठलेच अनुदान मिळालं नव्हतं, पण मी कृषि राज्यमंत्री झाल्यानंतर त्यात लक्ष घातलं आणि बावी गावाला 3 कोटींच्या विविध साहित्यांचे अनुदान वाटप केलं. वाढदिवस हे निमित्त आहे. त्यानिमित्ताने तुमच्या समस्या समजून घेणं, तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलोय. सिध्दनाथ मंदिराच्या पाठीमागून जो रस्ता हळगावला जातो तो देखील भविष्यात डांबरीकरणाचा झालेला असेल, असा शब्द त्यांनी यावेळी बोलताना दिला.

पाच वर्षांत एकाही गावाला टँकर लागला नाही

खांडवीत बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, जलसंधारण मंत्री असताना जलयुक्त शिवार योजना आपल्या भागात प्रभावीपणे राबवली. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत तालुक्यातील एकाही गावात टँकर लागला नाही. मी मंत्री असताना तहसील, पंचायत समिती, पोलिस स्टेशन, न्यायालय, शासकीय होस्टेल या इमारती उभारल्या. तसेच खर्डा, सोनेगाव व शिऊर या तीन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले. याची कोणीही मागणी केली नव्हती. पण आपल्या भागातील लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी मी पुढाकार घेतला आणि प्रश्न मार्गी लावले. विधानपरिषदेचा आमदार झाल्यापासून मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करतोय. आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. खांडवीचा विकास करण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. असे शिंदे म्हणाले.

जिथं प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तिथं मला दर्शन मिळालं

रत्नापुर येथे बोलताना शिंदे म्हणाले की,  आमदारकी असो की मंत्रीपद या काळात जे लोकं भेटले, ज्या व्यथा त्यांनी मांडल्या, जे दु:ख मांडलं, काम सांगितलं ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रामाणिक काम केलं. त्याचा सकारात्मक अनुभव अनेकदा आला. 22 तारखेला प्रभू राम चंद्राची प्राणप्रतिष्ठा आयोध्येत होत आहे. ज्या जागेवर प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या जागेवर जाण्याचा योग मला आला. ते केवळ आणि केवळ मी मंत्रिपदाच्या काळात केलेल्या कामामुळे आला. मंत्री असताना एका व्यक्तीचं मी काम केलं होतं. तो व्यक्ती आयोध्येत होता. वर्षभरापुर्वी जेव्हा मी आयोध्येत गेलो होतो, तेव्हा त्या व्यक्तीने मला फोन केला की, मी राम मंदिराच्या कामामध्येच आहे. मी इथला इनचार्ज आहे. तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर मी सोय करतो. तो व्यक्ती स्वता: गाडी घेऊन आला. मला घेऊन गेला. जिथं प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तिथं मला दर्शन दिलं. निस्वार्थ भावनेनं काम केल्यास त्याचा आपल्या जीवनात निश्चित फायदा होता, हेच या अनुभवातून अधोरेखित होत आहे, असे शिंदे म्हणाले.

जनता जनार्धन हाच माझा डोस

शिंदे पुढे म्हणाले, ज्या वेळेस आपण डाॅक्टरकडून एखादा डोस घेतो तेव्हा आपण ठणठणीत होतो, तसचं माझही आहे. जनता जनार्धन हाच माझा डोस आहे. त्यामुळेच मी आजही ठणठणीत आहे. मी केलेल्या कामामुळे सर्वसामान्य माणसांच्या चेहर्‍यावर निर्माण होणारे समाधान हीच माझी ऊर्जा आहे. त्यामुळेच आजतागायत मला कुठलीही व्याधी जडलेली नाही, असे सांगत आमदार प्रा राम शिंदे यांनी आपल्या ठणठणीत तब्येतेचे रहस्य उजागर केले.

बायका पोरं घेऊन मी परदेशात जात नाही

आपल्याकडे अलिकडे एक प्रथा आलीय. तुमचे फोटो घेऊन या बोर्ड घेऊन जा. बील आम्ही देऊ. पण अजून तरी तशी वेळ आपल्यावर आलेली नाही. माजी आमदार झाल्यावर सुध्दा आली नाही. आता तर मी आजी आमदार झालोय. लोकांना हे माहितीये वाढदिवस किती जरी साजरा झाला, किती जरी कार्यक्रम दिले तरी वाढदिवसादिवशी बायका पोरं घेऊन मी मतदारसंघातच असतो. बायका पोरं घेऊन मी परदेशात जात नाही. वाढदिवस हे निमित्त असतं. या दिवशी लोकांना भेटल् तर बरं वाटतं. लोकांना वाटतं की आपल्याला ध्यानात ठेवलयं. वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांमध्ये जाणं, कार्यकर्त्यांशी चर्चा करणं, भावना समजून घेणं, अडचणी समजून घेणं, दु:ख समजून घेणं, सुखात सहभागी होणं, हेच यानिमित्ताने महत्वाचं असतं, असे आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले.

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं हे खऱ्या अर्थानं मोठं यश

रत्नापुरमध्ये एकखट्या तीन बंधारे दिले. संपुर्ण गाव बागायती करण्याचं जे पुण्य मला लाभलं ते निश्चित स्वरूपामध्ये माझ्यासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. जिथं काही होत नव्हतं, तिथे जर ऊस पिकत असेल तर खऱ्या अर्थानं मी माझ्या बापाच्या पोटी जन्म घेतला आणि ते सिध्द करून दाखवलं. मी राजकारणात आल्यावर लोकांना मदतीचा हात देऊ शकलो. ज्या शेतकऱ्यांची जमीन जिरायती होती, त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं हेच खऱ्या अर्थानं मोठं यश आहे, असे यावेळी शिंदे म्हणाले.

वर्षभरात जामखेड शहराला उजनीचे पाणी

विधानपरिषदेचा आमदार झाल्याबरोबर जामखेड शहर पाणी योजना मंजुर करून आणली. एक वर्षभरात ही योजना पुर्ण होईल. भूतवडा व भूतवडा जोडतलाव असताना इतक्या लांबून पाणी का आणलं असं लोकांना वाटतयं, पण पुढील 25 वर्षाचा विचार करून हा निर्णय घेतलाय. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून उजनीवरून जामखेडला पाणी आणलयं, 250 कोटी रूपयांची ही योजना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी मंजुर केली आहे. मी मंत्री असताना 65 कोटी रूपये खर्चून शासकीय कृषि महाविद्यालय आणलं, कुसडगावला सीआरपीएफ सेंटर आणण्यासाठी माझ्या काळात सुरूवात झाली. मतदारसंघातील प्रत्येक गावाला रस्ते दिले, असे आमदार शिंदे म्हणाले.

युपी-बिहारचा गडी रातच्याला निघून गेल्यावर कुठून आणायचा?

गेल्या तीन वर्षांपुर्वी मतदारसंघातील परिस्थिती बदलली होती. पण आता कार्यकर्त्यांच्या पण लक्षात आलयं की, आपला गडी त्यो आपलाच असतो. लय बाहेरचा गडी कामाला ठेवून त्यो कधी गबाळ घेऊन जाईल याचा भरवसा नाही. रातच्याला त्याच्या ध्यानात आलं की आता इथं काही मजा नाही त्यो गडी कव्हा पळून जाईल सांगता येत नाही. गावातला गडी निघून गेल्यावर त्याला समजावून सांगता येतं पण युपी-बिहारचा गडी रातच्याला निघून गेल्यावर कुठून आणायचा? अशी परिस्थितीय. त्यामुळं आपला गडी कामाचाय, चांगलाय, कधी कोणाला वरच्या आवाजात बोललो नाही, कधी कोणाला मोबाईल फेकून हाणला नाही, कधी कोणाला गाडीतून खाली उतरवलं नाही, असे म्हणत फुकटचा लोकांना मानसन्मान सुध्दा देऊ शकत नाहीत अशी माणसं  काय करणार दुसर्‍यांसाठी असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर कडाडून हल्ला चढवला.

आपल्या भागाचं नेतृत्व सांभाळायची जबाबदारी तालुक्याची मतदारसंघाची

समोरच्या सगळ्या गड्यांनी मिळून माझा गेम केला. पक्षावाल्यांनी केला. बाहेरच्यांनी तर केलाच केला. त्यामुळं नुकसान तर माझं झालं त्यापेक्षा मतदारसंघाचं खूप मोठं नुकसान झालं. राज्यामध्ये आपल्या भागाचं नेतृत्व तयार होत असताना  नेतृत्व जपायची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आपल्या भागात कधीतरी नेतृत्व तयार होतं. हे नेतृत्व सांभाळायची जबाबदारी तालुक्याची मतदारसंघाची आहे, असे आमदार शिंदे म्हणाले.

हळगाव, बावी, खांडवी, रत्नापुर, पाटोदा, डोणगाव येथील स्थानिक भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या उत्साहात आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी तालुका भाजपचे पदाधिकारी व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.