जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 2 जानेवारी 2024 : जवळा गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. गावातील विविध विकास कामांना आजवर कोट्यावधींचा निधी दिलाय. यापुढील काळातही निधीची कमतरता भासू देणार नाही. जवळा ही माझी कर्मभूमी आहे. कर्मभूमीला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. नवीन संत सावता महाराज मैदानाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, मीच या मैदानाचा कायापालट करणार असा शब्द आमदार प्रा.राम शिंदे यांनी जवळा येथे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना दिला.
आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा नेते उमेश रोडे व जवळा भाजपच्या वतीने राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार प्रा.राम शिंदे बोलत होते. यावेळी भाजपा युवा नेते उमेश रोडे व भारतीय जनता पार्टी जवळा यांच्यावतीने आमदार राम शिंदे यांचा नागरी सत्कार करत आमदार प्रा.राम शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले की, जवळा ही माझी कर्मभूमी असल्याने विकास कामासाठी आलेल्या प्रत्येक निवेदनाची दखल घेऊन ते प्रश्न आजवर तात्काळ मार्गी लावत आलो आहे. जवळा ते बोर्ला या रस्त्याचा गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न मीच मार्गी लावला आहे. या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. ज्या ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम पार पडतोय त्या संत सावता महाराज मैदानाचाही आपणच कायापालट करू, या मैदानात विविध विकास कामे आगामी काळात मार्गी लावली जातील, त्यामुळे काळजी करू नका, या मैदानाचा मीच कायापालट करेन, असा शब्द देताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आमदार शिंदे यांचे स्वागत केले. आमदार शिंदे यांनी शब्द दिल्याने जवळा ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी ज्योती क्रांती सोसायटीचे व्हाईस चेअरमन दशरथ हजारे, संचालक मारुती रोडे, जवळा विविध कार्यकारी सोसायटीचे व्हॉइस चेअरमन शिवाजी कोल्हे, प्रशांत पाटील, गौतम कोल्हे, रामलिंग हजारे डॉ. दीपक वाळुंजकर, किसन सरोदे, राजेंद्र हजारे, उमेश हजारे, राजेंद्र महाजन, हबीब शेख, अभय नाळे , राहुल लोंढे, शुभम हजारे, पांडुरंग कोले, पांडुरंग हजारे, रामभाऊ होले, अक्षय हजारे सह जवळा ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करत युवा नेते उमेश रोडे यांनी नवा पायंडा पाडला. उमेश रोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.