Ram Shinde Birthday : 18 ग्रामसंघांना 2 कोटी 11 लाखांचे कर्ज वाटप, कर्जत जामखेडमध्ये महिलांसाठी मोठा प्रोजेक्ट आणणार – आमदार प्रा.राम शिंदे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । 1 जानेवारी 2024 : मनिषाताईंनी भाषण करताना सांगितलं की, आम्ही तुम्हाला काहीच मागणार नाही. पण मी तुम्हाला विश्वास देतो की, फक्त महिलांसाठीच या कर्जत जामखेडमध्ये असा प्रोजेक्ट आणेन की, संपूर्ण कर्जत-जामखेडमधील महिलांना मानाचं स्थान त्याच्यामधून मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत आमदार राम शिंदे यांनी महिलांसाठी मतदारसंघात मोठा प्रोजेक्ट आणणार असल्याचा संकल्प नववर्षाच्या प्रारंभी केला.
राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले प्रभाग संघाच्या वतीने 18 ग्राम संघांना 2 कोटी 11 लाख रूपये कर्जाचे वाटप करण्यात आले. आमदार प्रा.राम शिंदे व त्यांच्या पत्नी जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे यांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आले. सावित्रीबाई फुले प्रभाग संघाच्या सीपीसी मनिषाताई मोहळकर यांच्या पुढाकारातून व बोर्ला सेवा संस्थेचे चेअरमन जालिंदर चव्हाण यांच्या विशेष सहकार्यातून जामखेड तालुक्यातील नान्नज येथे 1 जानेवारी 2024 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार प्रा. राम शिंदे बोलत होते.
यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात बचत गटातील महिला सदस्यांच्या शेकडो लहान मुला-मुलींची मोफत आरोग्य तपासणी व आहार मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी ओम हॉस्पिटलने सहकार्य केले. त्याबरोबर महिला बचत गटांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच ज्योती क्रांती मल्टिस्टेट बँक योजना मार्गदर्शन त्याचबरोबर कांदा उद्योग प्रक्रिया मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी हजारो महिलांच्या उपस्थितीत आमदार प्रा.राम शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तत्पूर्वी माजी सभापती आशाताई शिंदे यांनी उपस्थित महिलांशी दिलखुलास संवाद साधला. त्यांनी उपस्थित महिलांची मने जिंकली.
पुढे बोलताना आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले की, मी 15 वर्षांपासून आमदार आहे. मंत्री झालो. माझ्या अनेकदा खूप मोठ्या सभा झाल्या पण कधीच आजच्या एवढ्या महिला माझ्या सभेला जमल्या नाहीत. पण गेल्या वर्षी व यावर्षी नान्नजमध्ये प्रचंड संख्येने महिला जमल्या आहेत. आज झालेली प्रचंड गर्दी ही मनिषाताईंची किमया आहे. ज्या दिवशी माझ्या हातात आणि पेनात सत्ता येईल त्या दिवशी मी महिलांच्या संदर्भामध्ये कर्जत जामखेडमध्ये निर्णय घेतल्याशिवाय राहणार आहे. निर्णय घेऊन महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित महिलांना दिला.
आमदार शिंदे पुढे म्हणाले की, मी जलसंधारण मंत्री होतो तेव्हा मतदारसंघात जलयुक्त शिवार योजना राबवली. त्यामुळे मतदारसंघात कुठेही गेल्या पाच वर्षांत टँकर लागला नाही. महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला. आता गावोगावी जलजीवन योजनेचे काम सुरू आहे. लवकरच या योजनेतून घरोघरी शुध्द पाण्याचा पुरवठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे महिलांची उद्योग व्यवसायात प्रगती होताना दिसत आहे. समाजात व कुटूंबात महिलांचा सन्मान वाढू लागलाय. बचत गटांच्या माध्यमांतून महिलांचे संघटन मजबूत होत आहे ही अभिमानास्पद बाब आहे, असे शिंदे म्हणाले.
यावेळी जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर, रमेश धोत्रे, हरीबा चांदगावे, प्रभागसंघाच्या अध्यक्ष रेणुका बोराटे, सचिव सारिका भोसले, अर्चना निगडे, दिपाली बांदल, पुजा सुतार, छाया कापसे, मालन कचरे, शुभांगी वाघमारे, रूक्साना शेख, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, बाजार समिती सभापती शरद कार्ले, माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, बापुराव ढवळे, प्रशांत शिंदे, अजिनाथ हजारे, सुनिल हजारे, अमित चिंतामणी सोमनाथ पाचरणे, डाॅ गणेश जगताप, तुषार पवार, उदय पवार, बिभीषण धनवडे, सरपंच सुशिल आव्हाड, सह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषाताई मोहळकर यांनी केले तर सूत्रसंचालन निकम महाराज यांनी केले.