जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । 1 जानेवारी 2024 । Ram Shinde Birthday : “ज्या वेळेस आपण डाॅक्टरांकडून औषधाचा एखादा डोस घेतो तेव्हा आपण ठणठणीत होतो, तसचं माझही आहे. जनता जनार्धन हाच माझा डोस आहे. त्यामुळेच मी आजही ठणठणीत आहे. मी केलेल्या कामामुळे सर्वसामान्य माणसांच्या चेहर्यावर निर्माण होणारे समाधान हीच माझी ऊर्जा आहे. त्यामुळेच आजतागायत मला कुठलीही व्याधी जडलेली नाही, असे सांगत आमदार प्रा राम शिंदे यांनी आपल्या ठणठणीत तब्येतेचे रहस्य उजागर केले.
31 डिसेंबर 2023 रोजी जामखेड तालुक्यातील हळगाव, बावी, खांडवी, जामखेड, रत्नापुर, पाटोदा, डोणगाव या ठिकाणी आमदार प्रा राम शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांनी नागरिकांशी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधत वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्विकार केला. रत्नापुर येथाल कार्यक्रमात सूत्रसंचालकाने आमदार शिंदे यांच्याकडे पाहून ते 55 वर्षाचे वाटत नाहीत हा विषय छेडला. त्यावर बोलताना शिंदे यांनी आपल्या ठणठणीत तब्येती विषयी भाष्य केले.
मी केलेल्या कामामुळे सर्वसामान्य माणसांच्या चेहर्यावर निर्माण होणारे समाधान हीच माझी ऊर्जा आहे. त्यामुळेच आजतागायत मला कुठलीही व्याधी जडलेली नाही,ज्या वेळेस आपण डाॅक्टरांकडून औषधाचा एखादा डोस घेतो तेव्हा आपण ठणठणीत होतो, तसचं माझही आहे. जनता जनार्धन हाच माझा डोस आहे. त्यामुळेच मी आजही ठणठणीत आहे, असे सांगत आमदार राम शिंदे यांनी आपल्या ठणठणीत तब्येतीविषयी भाष्य केले.
रत्नापुरमध्ये तीन बंधारे दिले. गावाचा पाण्याचा प्रश्न मिटला. संपुर्ण गाव बागायती करण्याचं जे पुण्य मला लाभलं ते निश्चित स्वरूपामध्ये माझ्यासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. जिथं काही होत नव्हतं, तिथे जर ऊस पिकत असेल तर खऱ्या अर्थानं मी माझ्या बापाच्या पोटी जन्म घेतला आणि ते सिध्द करून दाखवलं. मी राजकारणात आल्यावर लोकांना मदतीचा हात देऊ शकलो. ज्या शेतकऱ्यांची जमीन जिरायती होती, त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं हेच खऱ्या अर्थानं मोठं यश आहे, असे यावेळी शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, आमदारकी असो की मंत्रीपद या काळात जे लोकं भेटले, ज्या व्यथा त्यांनी मांडल्या, जे दु:ख मांडलं, काम सांगितलं ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रामाणिक काम केलं. त्याचा सकारात्मक अनुभव अनेकदा आला. 22 तारखेला प्रभू राम चंद्राची प्राणप्रतिष्ठा आयोध्येत होत आहे. ज्या जागेवर प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या जागेवर जाण्याचा योग मला आला. ते केवळ आणि केवळ मी मंत्रिपदाच्या काळात केलेल्या कामामुळे आला. मंत्री असताना एका व्यक्तीचं मी काम केलं होतं. तो व्यक्ती आयोध्येत होता. वर्षभरापुर्वी जेव्हा मी आयोध्येत गेलो होतो, तेव्हा त्या व्यक्तीने मला फोन केला की, मी राम मंदिराच्या कामामध्येच आहे. मी इथला इनचार्ज आहे. तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर मी सोय करतो. तो व्यक्ती स्वता: गाडी घेऊन आला. मला घेऊन गेला. जिथं प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे तिथं मला दर्शन दिलं. निस्वार्थ भावनेनं काम केल्यास त्याचा आपल्या जीवनात निश्चित फायदा होता, हेच या अनुभवातून अधोरेखित होत आहे, असे शिंदे म्हणाले.
समोरच्या सगळ्या गड्यांनी मिळून माझा गेम केला. पक्षावाल्यांनी केला. बाहेरच्यांनी तर केलाच केला. त्यामुळं नुकसान तर माझं झालं त्यापेक्षा मतदारसंघाचं खूप मोठं नुकसान झालं. राज्यामध्ये आपल्या भागाचं नेतृत्व तयार होत असताना नेतृत्व जपायची खबरदारी आपण घेतली पाहिजे. आपल्या भागात कधीतरी नेतृत्व तयार होतं. हे नेतृत्व सांभाळायची जबाबदारी तालुक्याची मतदारसंघाची आहे, असे आमदार शिंदे म्हणाले.
आपल्याकडे अलिकडे एक प्रथा आलीय. तुमचे फोटो घेऊन या बोर्ड घेऊन जा. बील आम्ही देऊ. पण अजून तरी तशी वेळ आपल्यावर आलेली नाही. माजी आमदार झाल्यावर सुध्दा आली नाही. आता तर मी आजी आमदार झालोय. लोकांना हे माहितीये वाढदिवस किती जरी साजरा झाला, किती जरी कार्यक्रम दिले तरी वाढदिवसाच्या दिवशी बायका पोरं घेऊन मी मतदारसंघातच असतो. बायका पोरं घेऊन मी परदेशात जात नाही. वाढदिवस हे निमित्त असतं. या दिवशी लोकांना भेटल तर बरं वाटतं. लोकांना वाटतं की आपल्याला ध्यानात ठेवलयं. वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांमध्ये जाणं, कार्यकर्त्यांशी चर्चा करणं, भावना समजून घेणं, अडचणी समजून घेणं, दु:ख समजून घेणं, सुखात सहभागी होणं, हेच यानिमित्ताने महत्वाचं असतं, असे आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले.
येणाऱ्या येणाऱ्या कालखंडामध्ये कोणाच्या नादाला लागू नका. भूलथापांना बळी पडू नका. मागच्यावेळी नादंवादं लागून जी चुक केली ती पुन्हा करू नका, आता आपलाच नाद करा. आपल्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, या भागातल्या, परिसरातल्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या माझ्या एवढ्या कोणालाच माहित नाहीत. त्या मी सोडवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या भागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्व मुलभूत सुविधा प्राप्त झाल्या पाहिजेत. यासाठी आजवर प्रामाणिक प्रयत्न केले. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात आनंद आला पाहिजे. प्रगती झाली पाहिजे. त्यादृष्टीने माझा नेहमी प्रयत्न असतो. तुमचा आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे आहे. यापुढेही कायम ठेवा. त्याला तडा जाऊ देणार नाही, असे आमदार शिंदे म्हणाले.
जलसंधारण मंत्री असताना जलयुक्त शिवार योजना आपल्या भागात प्रभावीपणे राबवली. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत तालुक्यातील एकाही गावात टँकर लागला नाही. मी मंत्री असताना तहसील, पंचायत समिती, पोलिस स्टेशन, न्यायालय, शासकीय होस्टेल या इमारती उभारल्या. तसेच खर्डा, सोनेगाव व शिऊर या तीन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले. याची कोणीही मागणी केली नव्हती. पण आपल्या भागातील लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी मी पुढाकार घेतला आणि प्रश्न मार्गी लावले. विधानपरिषदेचा आमदार झाल्यापासून मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करतोय. आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. खांडवीचा विकास करण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. असे शिंदे म्हणाले.
विधानपरिषदेचा आमदार झाल्याबरोबर जामखेड पाणी योजना मंजुर करून आणली. एक वर्षभरात ही योजना पुर्ण होईल. भूतवडा व भूतवडा जोडतलाव असताना इतक्या लांबून पाणी का आणलं असं लोकांना वाटतयं, पण पुढील 25 वर्षाचा विचार करून हा निर्णय घेतलाय. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून उजनीवरून जामखेडला पाणी आणलयं, 250 कोटी रूपयांची ही योजना विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी मंजुर केली आहे. मी मंत्री असताना 65 कोटी रूपये खर्चून शासकीय कृषि महाविद्यालय आणलं, कुसडगावला सीआरपीएफ सेंटर आणण्यासाठी माझ्या काळात सुरूवात झाली. मतदारसंघातील प्रत्येक गावाला रस्ते दिले, असे आमदार शिंदे म्हणाले.
गेल्या तीन वर्षांपुर्वी मतदारसंघातील परिस्थिती बदलली होती. पण आता कार्यकर्त्यांच्या पण लक्षात आलयं की, आपला गडी त्यो आपलाच असतो. लय बाहेरचा गडी कामाला ठेवून त्यो कधी गबाळ घेऊन जाईल याचा भरवसा नाही. रातच्याला त्याच्या ध्यानात आलं की आता इथं काही मजा नाही त्यो गडी कव्हा पळून जाईल सांगता येत नाही. गावातला गडी निघून गेल्यावर त्याला समजावून सांगता येतं पण युपी-बिहारचा गडी रातच्याला निघून गेल्यावर कुठून आणायचा? अशी परिस्थितीय. त्यामुळं आपला गडी कामाचाय, चांगलाय, कधी कोणाला वरच्या आवाजात बोललो नाही, कधी कोणाला मोबाईल फेकून हाणला नाही, कधी कोणाला गाडीतून खाली उतरवलं नाही, असे म्हणत फुकटचा लोकांना मानसन्मान सुध्दा देऊ शकत नाहीत अशी माणसं काय करणार दुसर्यांसाठी असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर कडाडून हल्ला चढवला.
हळगाव, बावी, खांडवी, रत्नापुर, पाटोदा, डोणगाव येथील स्थानिक भाजपा कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या उत्साहात आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी तालुका भाजपचे पदाधिकारी व नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.