Ram Shinde Birthday : जामखेडला कुकडीचे पाणी कधी येणार यावर आमदार प्रा.राम शिंदे यांचे मोठे वक्तव्य

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । 1 जानेवारी 2024 । Ram Shinde Birthday : “मी कव्हा म्हणलं होतं आपल्या गावात काॅलेज आणीन पण शासकीय कृषि महाविद्यालय आणलं, काही लोकं म्हणले कुसळात काॅलेज असतं का? तो भाग वेगळा पण काॅलेज आणूनच दाखवलं, मी कधीच म्हणलो नाही कुकडीचे पाणी आणीन, पण जेव्हा केव्हा माझ्या हातात मोठी सत्ता येईल त्यावेळेस हे काम मी नक्की करीन. असे मोठे वक्तव्य करत आमदार प्रा राम शिंदे यांनी जामखेड तालुक्यात कुकडीचे पाणी आणण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे हळगाव येथे बोलताना स्पष्ट केले.”

Ram Shinde Birthday news, MLA Prof. Ram Shinde's big statement on when kukadi water will come to Jamkhed

31 डिसेंबर 2023 रोजी जामखेड तालुक्यातील हळगाव, बावी, खांडवी, जामखेड, रत्नापुर, पाटोदा, डोणगाव या ठिकाणी आमदार प्रा राम शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार प्रा.राम शिंदे यांनी नागरिकांशी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधत वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्विकार केला.

यावेळी बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले की, आपल्याकडे अलिकडे एक प्रथा आलीय. तुमचे फोटो घेऊन या बोर्ड घेऊन जा. बील आम्ही देऊ. पण अजून तरी तशी वेळ आपल्यावर आलेली नाही. माजी आमदार झाल्यावर सुध्दा आली नाही. आता तर मी आजी आमदार झालोय. लोकांना हे माहितीये वाढदिवस किती जरी साजरा झाला,किती जरी कार्यक्रम दिले तरी वाढदिवसाच्या दिवशी बायका पोरं घेऊन मी मतदारसंघातच असतो. बायका पोरं घेऊन मी परदेशात जात नाही. वाढदिवस हे निमित्त असतं. या दिवशी लोकांना भेटल तर बरं वाटतं. लोकांना वाटतं की आपल्याला ध्यानात ठेवलयं. वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांमध्ये जाणं, कार्यकर्त्यांशी चर्चा करणं, भावना समजून घेणं, अडचणी समजून घेणं, दु:ख समजून घेणं, सुखात सहभागी होणं, हेच यानिमित्ताने महत्वाचं असतं, असे आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले.

येणाऱ्या येणाऱ्या कालखंडामध्ये कोणाच्या नादाला लागू नका. भूलथापांना बळी पडू नका. मागच्यावेळी नादंवादं लागून जी चुक केली ती पुन्हा करू नका, आता आपलाच नाद करा. आपल्या माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, या भागातल्या, परिसरातल्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या माझ्या एवढ्या कोणालाच माहित नाहीत. त्या मी सोडवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या भागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्व मुलभूत सुविधा प्राप्त झाल्या पाहिजेत. यासाठी आजवर प्रामाणिक प्रयत्न केले. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात आनंद आला पाहिजे. प्रगती झाली पाहिजे. त्यादृष्टीने माझा नेहमी प्रयत्न असतो. तुमचा आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी खंबीरपणे आहे. यापुढेही कायम ठेवा. त्याला तडा जाऊ देणार नाही, असे आमदार  शिंदे म्हणाले.

जलसंधारण मंत्री असताना जलयुक्त शिवार योजना आपल्या भागात प्रभावीपणे राबवली. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत तालुक्यातील एकाही गावात टँकर लागला नाही. मी मंत्री असताना तहसील, पंचायत समिती, पोलिस स्टेशन, न्यायालय, शासकीय होस्टेल या इमारती उभारल्या. तसेच खर्डा, सोनेगाव व शिऊर या तीन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले. याची कोणीही मागणी केली नव्हती. पण आपल्या भागातील लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी मी पुढाकार घेतला आणि प्रश्न मार्गी लावले. विधानपरिषदेचा आमदार झाल्यापासून मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करतोय. आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे. खांडवीचा विकास करण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. असे शिंदे म्हणाले.