जामखेड : हळगाव कृषि महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : 28 सप्टेंबर 2023 : कृषि क्षेत्रात मुबलक व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर कृषि पदवीचे शिक्षण घेण्याचा विद्यार्थ्यांनी योग्य निर्णय घेतला आहे, भविष्यात कृषि पदवीधर हे प्रगतशील शेतकरी, यशस्वी उद्योजक, उत्तम प्रशासक, प्राध्यापक इत्यादी बनू शकतात, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव येथे कृषि पदवी अभ्यासक्रम 2023-24 या शैक्षणिक वर्षात नव्याने दाखल झालेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे हे होते.

यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय  सोनावणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पोपट पवार, विध्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे, परीक्षा प्रभारी अधिकारी डॉ. प्रेरणा भोसले, वसतिगृह कुलमंत्री व शैक्षणिक प्रभारी अधिकारी डाॅ. मनोज गुड, प्रा. अरूण पालंदे उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डाॅ गोरक्ष ससाणे यांनी प्रथम वर्षात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत केले. तसेच पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. व्यक्तीमत्व विकास करण्याच्या दृष्टीकोनातून वसतिगृहात, महाविद्यालयात वावरताना चांगल्या सवयी अंगीकारून, शिस्तीचे पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा परिचय करून देण्यात  आला. यानंतर महाविद्यालयातील विविध अधिकारी यांनी संबंधित विभागांची व वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली.

विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. दत्तात्रय  सोनावणे यांनी चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात महाविद्यालयाला नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्यास विद्यार्थ्यांना सूचित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रणाली ठाकरे व आभारप्रदर्शन डॉ. निकीता धाडगे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.