शेतकरी ग्रामविकास आघाडीचं ठरलं…उद्या फुटणार प्रचाराचा नारळ, प्रशांत शिंदे आणि काकासाहेब वाळुंजकर म्हणतात करारा जवाब मिलेगा !
जामखेड, दि 12 एप्रिल, सत्तार शेख, जामखेड टाईम्स वृत्तसेवा । संपूर्ण जामखेड तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या जवळा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीचा प्रचार भलताच तापला आहे. 11 रोजी शेतकरी विकास आघाडीने प्रचाराचा नारळ फोडून धुराळा उडवून दिला. आता शेतकरी ग्रामविकास आघाडीकडून विरोधकांना करारा जवाब देण्याचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे. उद्या 13 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता शेतकरी ग्रामविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे अशी माहिती प्रशांत शिंदे यांनी दिली.
जवळा सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास आघाडी विरूध्द शेतकरी ग्रामविकास आघाडी असा थेट सामना रंगला आहे. सोसायटीवर कब्जा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, माजी सभापती सुभाष अव्हाड यांच्या पॅनलविरोधात आघाडी उघडली आहे. 11 एप्रिल रोजी शेतकरी विकास आघाडीने प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी झालेल्या प्रचार सभेत सरपंच उपसरपंच यांच्यावर आरोपांची राळ उठवत प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले.
दरम्यान सरपंच प्रशांत शिंदेंच्या नेतृत्वाखालील शेतकरी ग्रामविकास आघाडीने विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी उद्याचा मुहूर्त ठरवला आहे. उद्या 13 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता शेतकरी ग्रामविकास आघाडीची प्रचारसभा होणार आहे.सभेपूर्वी जवळा फाट्यापासून भव्य रॅली निघणार आहे. त्यानंतर जवळेश्वर मंदिरासमोर सभा होणार आहे.या सभेत शेतकरी ग्रामविकास आघाडीचे नेते काय बोलणार ? सोसायटीच्या कारभाराचा काय भांडाफोड करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि स्व. श्रीरंगराव कोल्हे व स्व. प्रदिप (आबा) पाटील यांच्या आशीर्वादाने जवळा सोसायटीच्या निवडणूकीत शेतकरी ग्रामविकास आघाडी निवडणुकीला सामोरी जात आहे. या आघाडीत सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर, माजी सभापती सुभाष अव्हाड, मुरलीधर (अण्णा) हजारे, दशरथ कोल्हे, प्रमोद कोल्हे,राम वाळुंजकर, सावता हजारे, अप्पासाहेब मते, भाऊसाहेब कसरे, रघुनाथ मते, कल्याण रोडे, बिभीषण लेकुरवाळे, सुरेश पठाडे, दयानंद कथले,दीपक देवमाने, राहूल पाटील, अंगद मुळे, शिवराज देवमुंडे, बाजीराव खाडे, माऊली देवमुंडे, नारायण पागिरे, भाऊसाहेब सुळ, किसन गोयकर सह आदी नेते आहेत. सोसायटीवर कब्जा मिळवण्यासाठी शेतकरी ग्रामविकास आघाडी प्रयत्नशील आहे.