शिवशक्ती परिक्रमा यात्रेचे उद्या जामखेड तालुक्यात आगमन, आमदार प्रा.राम शिंदे यांच्यावतीने पंकजाताई मुंडे यांचे होणार जंगी स्वागत !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय महासचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्रात शिवशक्ती परिक्रमा यात्रा हाती घेतली आहे. ही यात्रा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून जात आहे. उद्या 9 सप्टेंबर 2023 रोजी जामखेड तालुक्यात या यात्रेचे आगमन होणार आहे. आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जामखेड तालुका भाजपने पंकजात़ाई मुंडे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. पंकजाताई यांच्या दौऱ्यामुळे भाजपात उत्साह संचारला आहे.
श्रावण महिन्याचे औचित्य साधून शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे चार सप्टेंबरपासून राज्याचा दौर्यावर आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या देवस्थानांचे त्या दर्शन घेत आहेत. त्याबरोबर या प्रवासात त्या ठिकठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. शिव-शक्ती परिक्रमा यात्रेमुळे भाजपा व मुंडे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. सध्या ही यात्रा अंतिम टप्प्यात आहे. यात्रेचा समारोप 11 रोजी परळी येथील ज्योतिर्लिंग मंदिरात होणार आहे. तत्पूर्वी ही परिक्रमा यात्रा जामखेड तालुक्यातून जाणार आहे. या यात्रेच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या स्वागतासाठी आमदार प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड भाजपने जंगी तयारी केली आहे. पंकजाताई यांच्या स्वागतासाठी जामखेड शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. उद्या 9 रोजी पंकजाताई यांचे जामखेड येथे सकाळी 11 च्या सुमारास आगमन होणार आहे.
जामखेड येथील करमाळा चौक व खर्डा चौकात भाजपकडून पंकजाताई यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. आमदार प्रा राम शिंदे यांच्या वतीने खर्डा चौकात पंकजाताई मुंडे यांचे भव्य दिव्य स्वागत केले जाणार आहे. यासाठी भव्य असा 22 फुटी फुलाचा हार तयार करण्यात आला आहे. तसेच दहा जेसीबी मशिनद्वारे फुलांची उधळण केली जाणार आहे. भाजपने पंकजाताई यांच्या स्वागताची सर्व तयारी पुर्ण केली आहे.
पंकजाताईंचे खर्डा परिसरात होणार जंगी स्वागत
जामखेड शहरातील स्वागत स्वीकारून पंकजाताई खर्डा भागाकडे रवाना होणार आहेत. खर्डा भाजप व मुंडे समर्थकांकडून लोणी फाटा ते सिताराम गड अशी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सिताराम गडावर दर्शन घेतल्यानंतर खर्डा बसस्थानक परिसरात नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर पंकजाताई यांच्या हस्ते नागोबाचीवाडी येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते स्व गोपीनाथरावजी मुंडे प्रवेशद्वाराचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर पंकजाताई गितेबाबा समाधीचे दर्शन घेणार आहेत. या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात त्यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर त्या भाजपा नेते नानासाहेब गोपाळघरे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर पंकजाताई पाटोदा जि बीड कडे रवाना होणार आहेत.
जामखेड शहर व खर्डा या भागात पंकजाताई यांचे भव्यदिव्य जंगी स्वागत होणार असल्याने भाजपा व मुंडे समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. जामखेड तालुका पंकजाताई मुंडे यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.