जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यात प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी महाफेरफार अदालत होणार आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्रमांक २०२०/प्र क २०/म-५ दिनांक ७ सप्टेबर २०२० अन्वये मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे निर्देशानुसार महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम,गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियाना अंतर्गत कर्जत आणि जामखेड तालुक्यातील सर्व महसूल मंडळाच्या मुख्यालयी फेरफार अदालत दर महिन्याच्या ४ थ्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता (४ थ्या शुक्रवारी शासकीय सुट्टी असल्यास त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी ) फेरफार अदालत घेण्यात येणार आहे.
यामध्ये कर्जत आणि जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि खातेदार यांचे प्रलंबित असणारे फेरफार त्यात वारस नोंदी, बोजा ,गहाणखत ,खरेदी विक्री नोंदी ,कलम १५५ प्रमाणे ७/१२ मधील आवश्यक दुरुस्ती वेळेत पूर्ण होणे कामी सदरची फेरफार अदालत आयोजित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम योग्य रीतीने व्हावा यासाठी प्रत्येक मंडळाला नायब तहसीलदार यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे आणि ते सदर दिवशी प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रम योग्य रितीने होत आहे किंवा नाही याची पाहणी करून त्याबाबत अहवाल सदर करणार आहेत. सदर दिवशी त्या मंडळातील सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी हे मंडळाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
तरी कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्व नागरिकांनी फेरफार अदालतीमध्ये प्रलंबित फेरफार मंजूर करून घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहावे .सदर फेरफार अदालतीमध्ये प्रलंबित फेरफार संबंधी कार्यवाही विशेष वेळेत करून दिली जाणार असल्याने,सर्व शेतकरी आणि खातेदार यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खातेदार आणि शेतकरी यांनी या अभियानाचा फायदा घ्यावा असे अवाहन प्रांंताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी केले.