अहोरात्र सामाजिक सेवेचे प्रामाणिक कार्य करणाऱ्या प्रशांत शिंदेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा – ज्ञानेश्वर माऊली पठाडे महाराज
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । आजवर आपण दुसर्यांनाच मोठं करत आलोत, परंतू आता आपल्या गावातील परिसरातील कर्तृत्ववान माणसांना मोठं करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. समाजाच्या सेवेसाठी जी व्यक्ती अहोरात्र प्रामाणिकपणे काम करतेेय, त्याला पाठबळ द्यायला शिका. कोरोना महामारीच्या काळात अनेक गावपुढारी घरात बसले होते, शेजारी पण जवळ येत नव्हते, अश्यावेळी प्रशांत भाऊ रस्त्यावर उतरून काम करत होते, हे विसरू नका, प्रशांत भाऊंसारखे उच्चशिक्षित तरूण राजकारणात आलेत, हे आपलं भाग्य आहे. त्यांनी आजवर केलेले सामाजिक सेवेचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली पठाडे महाराज यांनी केले.
जामखेड तालुक्यातील लोकप्रिय युवा नेते तथा जवळ्याचे सरपंच प्रशांत भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत भाऊ शिंदे युवा मंचच्या वतीने झी टाॅकिज फेम, विनोदाचार्य ह.भ.प ज्ञानेश्वर माऊली पठाडे महाराज यांच्या जाहीर हरि किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पठाडे महाराज आणि कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उषाताई राऊत यांच्या हस्ते सरपंच प्रशांत शिंदे यांना केक कापून अभीष्टचिंतनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
जवळा परिसराला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रशांत भाऊ शिंदेंना पाठबळ द्या – उषा राऊत
यावेळी बोलताना कर्जतच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांनी सरपंच प्रशांत भाऊ शिंदे यांच्या कार्याचा गौरव केला. समाजाची सेवा करण्यासाठी प्रशांत भाऊ अहोरात्र काम करत आहेत, शांत, संयमी, विकासाभिमूख, सृजनशील तरूण नेतृत्व गावाला लाभले आहे. त्यांच्या माध्यमांतून गावाचा चेहरा मोहरा बदलत आहे. अगामी काळातही जवळा परिसराला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी प्रशांत भाऊ शिंदेंना पाठबळ द्या, असे अवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
गावाच्या विकासाबरोबर अध्यात्मिक विकास व्हावा हा विचार कौतुकास्पद
यावेळी बोलताना पठाडे महाराज म्हणाले की, सध्या वाढदिवसानिमित्त वेगळेच कार्यक्रम घेण्याची परंपरा सुरू झालीय, तरूणांना बिघडवण्याचे उद्योग सुरू आहेत, पण प्रशांत भाऊंच्या वाढदिवसानिमित्त किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करून जवळ्यातील तरूणांनी कौतुकास्पद असा वेगळा पायंडा आहे. समाजात जो चांगल काम करतो त्याला पुढारी वर्ग असो वा इतर प्रस्थापित नेहमी विरोध करत आलेत, पण प्रामाणिकपणे जनसेवेचे कार्य करणाराला नेहमी पाठबळ देणे ही काळाची गरज आहे. सुशिक्षित तरूणच देशाचं खरं भविष्य आहे. गावाच्या विकासाबरोबर अध्यात्मिक विकास व्हावा हा विचार प्रशांत भाऊ युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी प्रशांत भाऊंच्या वाढदिवसानिमित्त केला, ही बाब कौतुकास्पद आहे,असे पठाडे महाराज म्हणाले.
नोकरीचा त्याग करणे ही सोपी गोष्ट नाही
सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढलीय, तरूणांना नोकऱ्या मिळत नाहीत, परंतू प्रशांत भाऊ शिंदे सारखा तरूण लाखो रूपये पगाराची नोकरी सोडून सामाजिक सेवेत सक्रीय झालाय, नोकरीचा त्याग करणे ही सोपी गोष्ट नाही, पण त्यांचं हे धाडस तुमच्या सेवेसाठी आहे. त्यांनी आजवर प्रामाणिकपणे गावची सेवा केलीय, हे त्यांनी केलेलं काम बोलत आहे. प्रशांत भाऊंच्या सरपंचपदाच्या काळात गावात भरपुर विकास कामे झाली. त्यामध्ये त्यांनी घंटागाडी, अंडर ग्राऊंड गटार योजना, अंतर्गत रस्ते, जलजीवन योजना, तलाठी कार्यालय, मराठी शाळा संरक्षक भिंत, दलित वस्ती सुधार योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना राबवल्या, प्रशांत भाऊंसारख्या तरूणांची गावा गावात गरज आहे, त्यांनी हाती घेतलेल्या पाठबळ द्या, असे अवाहन यावेळी पठाडे महाराजांनी केले.
जगाला स्थिर करण्याची खरी ताकद वारकरी संप्रदायात
सध्या टिव्हीवर सुरू चांगलं दाखवलच जात नाही, दहा मिनिटं जरी टिव्हीवर बघितला तरी दिवसभर करमत नाय, माणूस अस्वस्थ राहतोय, राजकीय टीका टिप्पणीने तर कळस गाठलाय, जनतेचे प्रश्न बाजूला पडत आहेत, आरं जगु द्या लगा आम्हाला असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. सगळ्या जगात अस्थिरता आली आहे. अस्थिर जगाला स्थिर करण्याची खरी ताकद वारकरी संप्रदायात आहे, असेही पठाडे महाराज म्हणाले.
ऐकमेका सहाय्य करू.. अवघे धरू सुपंथ
ऐकमेका सहाय्य करू.. अवघे धरू सुपंथ या अभंगावर पठाडे महाराज यांनी जवळेकरांना मार्गदर्शन केले. सगळ्यांचा समावेश करणारे जगामध्ये ऐकमेव सात्विक माध्यम म्हणजे किर्तन होय असे सांगत ऐकमेका सहाय्य करू.. अवघे धरू सुपंथ हा विचार पुढे घेऊन जाणे आवश्यक आहे, तुकोबा आणि ज्ञानोबांचा विचारच समाजात स्थिरता ठेऊ शकतो, याच विचारातून सामाजिक सेवेचा पाया रचला जात असल्याचेही पठाडे महाराज म्हणाले.
क्वाॅलिटीला समाजात किंमत…
तरूणांचे लग्न होत नसल्याने लग्नाळू तरूणांनी नुकताच सोलापुरात मोर्चा काढला होता, यावर भाष्य करताना पठाडे महाराज म्हणाले की, आधी तरूणांनी स्वता:मध्ये क्वाॅलिटी कमवायला हवी, मग बघा, पोरीच्या बाबाचा फोन येईल, कधी लगीन करायचं? तहसीलदार, पीएसआय, डाॅक्टर यांची लग्न ताटकळलेत असं कधी ऐकलयं का? अशी कधी बातमी आली का पेपरात ? तर नाही, कारण, क्वाॅलिटीला समाजात किंमतयं, तरूणांनो आयुष्यात काहीतरी नवीन करत रहा, व्यसनापासून दुर रहा, मोठ्या माणसांविषयी आदरभाव ठेवा, असे अवाहन त्यांनी केले.
तरूणांनो परमार्थाकडे चला.. तुमची परमार्थाला गरज
सध्या लग्नसोहळे वेळेवर लागत नाहीत यावरही पठाडे महाराजांनी भाष्य केले. लग्न जर तुम्हाला वेळेवर लावायचं नसेल तर लग्न साडेबारा ते पाच या वेळेत कधीही लागेल, अशी लग्नपत्रिकेतच टिप टाकत जा, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. लग्नाला येणारे पाहूणे लग्न वेळेत पोहचण्यासाठी मरूस्तोवर धावाधाव करतात, त्यांचा कोणीच विचार करत नाही, नवरदेवाचे पेताड मित्र नाचगाण्यात मश्गुल राहून लग्नाची वाट लावून टाकतात, समाजाने वेळेवर लग्न लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, लग्नाला हजर राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा वेळ महत्वाचा आहे, याचे भान ठेवायला हवे. तरूणांनो नाचायचचं आहे, तर नाचु किर्तनाचे रंगी, असे म्हणत तरूणांनो परमार्थाला तुमची गरज आहे, असेही पठाडे महाराज म्हणाले.
ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांच्या किर्तनासाठी जवळा परिसरातील भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला. विशेषता: महिलांची उपस्थित लक्षणीय होती. पठाडे महाराजांनी केलेल्या अप्रतिम किर्तनाने उपस्थितांची मने जिंकली.