खर्डा पोलिस स्टेशन हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच, तेलंगशीत भरदिवसा घरफोडी, जनतेत पसरले भीतीचे वातावरण
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । खर्डा पोलिस स्टेशन हद्दीत भरदिवसा घरफोड्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असल्याने जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. यापुर्वी देवदैठण आणि नाहूली भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. आता तेलंगशीत चोरट्यांनी आपला मोर्चा वळवत तब्बल अडीच लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सध्या बळीराजा शेतीच्या कामात गुंतला आहे. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे भरदिवसा घरफोडी करताना दिसत आहेत. जामखेड पोलिस स्टेशन व खर्डा पोलिस स्टेशन या दोन्ही पोलिस स्टेशनच्या हद्दीत भरदिवसा घरफोडीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.अश्यातच खर्डा पोलिस स्टेशन हद्दीतील तेलंगशी गावात दोन लाख 45 हजाराची जबरी चोरी होण्याची घटना 14 रोजी घडली आहे.
तेलंगशी गावातील जाधव वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केली. येथील तरूण शेतकरी शहाजी बिभीषण जाधव (वय 28) हे आपल्या शेतात काम करण्यास गेले असता, अज्ञात चोरट्यांनी जाधव यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला.
घरातील कपाट व सामानाची उचकापाचक करत घरातील दोन लाख रूपये रोख आणि 45 लाख रूपये किमतीचे दागिणे असा ऐवज लंपास केला. ही घटना 14 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत घडली. या प्रकरणी खर्डा पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात शहाजी बिभीषण जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे हे करत आहेत.
जामखेड तालुक्यात सक्रीय असलेल्या चोरट्यांमुळे जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दीड दोन महिन्यांत जामखेड तालुक्यात चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या गुन्ह्यांचा तातडीने तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात आणि जनतेला पोलिसांनी दिलासा द्यावा अशी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे.