जामखेड टाईम्स वृत्तसेवा : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना खर्च सादर करण्यासाठी आता तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. कारण ‘ट्रू व्होटर हे मोबाईल ॲप’ (true voter app) च्या मदतीने निवडणुक खर्च सादर करण्याची मुभा निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा आदींसाठी उपयुक्त असलेल्या ‘टू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी ही माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी दिली.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ नुसार निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणुकीच्या निकालानंतर ३० दिवसांच्या आत एकूण खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत आणि पद्धतीने खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र घोषित करण्यात येते. त्यादृष्टीने उमेदवारांच्या सोयीसाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘टू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा ऐच्छिक स्वरूपाची आहे; परंतु याद्वारे किंवा पारंपरिक पद्धतीने विहित मुदतीत खर्च सादर करणे बंधनकारक आहे.
निवडणूक खर्च सादर करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची सूचना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिकेवर निकाल देताना केली होती. त्यादृष्टीने ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’ उपयुक्त ठरत आहे. त्याचा वापर 2017 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. यात निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याबरोबरच मतदार यादीत नाव शोधणे, मतदान केंद्राचे ठिकाण शोधणे, उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती जाणून घेणे आदी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. निवडणुकांशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीमतदार यादी बनविणे, मतदान केंद्रांचा नकाशा तयार करणे, महत्वाचे अहवाल सादर करणे, मतदानाची आकडेवारी देणे आदी सुविधा आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका लढविलेल्या 80 हजार उमेदवारांनी देखील हे ॲप डाऊनलोड केले आहे, असेही मदान यांनी सांगितले.