Zikri’s school in the midst of controversy demanding suspension of teachers
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 8 जानेवारी । झिक्री प्राथमिक शाळा सध्या एका अंदोलनामुळे तालुक्यात चर्चेत आली आहे. शाळेला काही ग्रामस्थांनी कुलूप ठोकले होते.शाळेला कुलूप ठोकूनही प्रशासनाला वेळेत न कळवल्याने शिक्षक, शिक्षिका व केंद्र प्रमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी ऋषीकेश साळुंके यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. यामुळे झिक्रीची शाळा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
झिक्री शाळेच्या मुख्याध्यापिका मनमानी कारभार करत असून त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी यासाठी 3 जानेवारीला सरपंच नंदा साळुंके आणि काही नागरिकांनी शाळेला कुलूप ठोकले होते. तसेच उपोषण सुरू केले होते. दि 6 रोजी गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी शाळेस भेट देऊन संबंधित अंदोलन मिटवले.
दरम्यान शाळेला कुलूप ठोकण्याच्या अंदोलनाची रितसर खबर देणे गरजेचे असताना वेळेची दखल न घेता आपणास (गटशिक्षणाधिकारी) खबर दिली नाही म्हणून झिक्री शाळेचे शिक्षक, शिक्षिका व केंद्र प्रमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी झिक्री येथील युवक कार्यकर्ते ऋषीकेश साळुंके यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
एकिकडे शाळेला कुलूप ठोकण्याच्या अंदोलनामुळे झिक्री शाळा चर्चेत आली होती. आता निलंबनाच्या मागणीने ही शाळा पुन्हा चर्चेत आली आहे. गावातील राजकारण शाळेभोवती फिरू लागल्याने शिक्षक मात्र अडचणीत आले आहेत.