जामखेड टाइम्स वृत्तसेवा : नाजुक प्रकरणातून सातत्याने राज्यात चर्चेत येणाऱ्या हनुमान गडाच्या मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराजाचे आणखीन एक प्रकरण जामखेड तालुक्यातून समोर आले आहे. या प्रकरणातील पिडीतेने हनुमान गडाच्या मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराजांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने मोठी खळबळ उडवून दिली आहे.
बुवासाहेब खाडे महाराज सातत्याने नाजूक प्रकरणामुळे वादग्रस्त ठरत आले आहेत. मागील काही वर्षांत महिलेसोबतच्या काॅल रेकॉर्डिंगमुळे ते चर्चेत आले होते. आता पिडीत महिलेने महाराजाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याने खाडे महाराजांची रासलीला उजेडात आली आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरातील एका पिडीतेने बुवासाहेब खाडे महाराजाविरोधात खर्डा पोलिस स्टेशनला गु.रजि. नंबर 06/2022 कलम 376 (N), 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दाखल फिर्यादीत म्हटले आहे की, पिडीतेस सोन्याच्या दागिण्याचे आणि लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीच्या संमतीशिवाय हनुमानगड आणि खर्डा परिसरात खाडे महाराजांनी वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरु होता. पिडीतेच्या घरातच खाडे महाराजाची रासलिला पकडण्यात आल्याने महाराजाचा वासनांध चेहरा उजेडात आला अशी चर्चा आहे.
दरम्यान बुवासाहेब खाडे महाराजांना मारहाण झाल्याची घटना मागील पाच दिवसांपुर्वी खर्डा परिसरातील एका गावात घडली होती. नाजूक प्रकरणामुळे महाराजांना मजबुुत चोप देण्यात आल्याची चर्चा तालुक्यात रंगली होती. खाडे महाराजावर गुन्हा दाखल झाल्याने ही चर्चा आता खरी ठरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास खर्डा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करत आहेत.
पोलिसांनी पिडीतेला न्याय मिळवून द्यावा
हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज हे आध्यात्मिक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आहे. अनेक राजकारणी त्यांचे भक्त आहेत. महाराजांच्या भक्तांकडून पोलिसांवर दबाव आणला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांना सर्व प्रकारचा दबाव झुगारावा लागणार आहे. पिडीतेच्या पाठीशी आपली ताकद उभी करून पिडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा तसेच वासनांध महाराजाला वाचवण्यासाठी जे कोणी पुढे येतील त्यांना कायद्याच्या दंडूक्याचा हिसका दाखवावा अशी मागणी जनतेतून होत आहे.