जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सध्या सुगीचे दिवस सुरू आहेत. ज्वारी काढण्यासाठी शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतात जात आहेत, यामुळे शेतकऱ्यांची घरे बंद असतात, याच संधीचा फायदा उचलत अज्ञात चोरट्यांनी चुंबळी गावात भरदिवसा घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी तब्बल 3 लाख 22 हजार रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला आहे.भरदिवसा घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी रामभाऊ सिताराम कारंडे वय, 32 वर्षे, रा. गडदेवस्ती, चुंबळी, ता. जामखेड हे दि 2 मार्च रोजी सकाळी आपल्या पत्नीसह शेतात ज्वारी काढण्यासाठी गेले होते. तर त्यांची दोन मुले हे शाळेत गेले होते. त्यामुळे घराला कुलूप लावले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी कारंडे यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाट उचकटून कपाटातील गाई घेण्यासाठी ठेवण्यात आलेले रोख 3 लाख 22 हजार रूपये व बँकेचे दोन ए टी एम कार्ड चोरुन नेले.
फिर्यादी कारंडे हे शेतातून सायंकाळी घरी आले आसता त्यांना आपल्या घराचे दार उघडे दिसले त्यामुळे त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांना घरातील कपाटाचे लॉक तुटलेले आणि घरातील सामान अस्त व्यस्त पडलेले दिसले. यावेळी फिर्यादी यांनी कपाटात पाहिले असता गाई घेण्यासाठी कपाटात ठेवलेले 3 लाख 22 हजार रुपये रोख व दोन ए टी एम कार्ड चोरट्यांनी चोरुन नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
या प्रकरणी फिर्यादी रामभाऊ कारंडे रा. चुंबळी यांनी अज्ञात चोरट्याविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.