जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 30 ऑक्टोबर 2022 । खर्डा पोलिस स्टेशन हद्दीत भरदिवसा घरफोडी होण्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तब्बल 75 हजाराच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारत पोबारा केला.या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खर्डा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील अजिनाथ भोरे यांच्या घरातील कुलूप तोडून घरातील तब्बल 75 हजाराच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला, या घटनेत चोरट्यांनी घरात प्रवेश करत सामानाची उचकापाचक करत घरातील रोकड आणि दागिणे लंपास केले. ही घटना 29 रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेत घडली.
या घटनेत आजिनाथ भोरे यांच्या घरातील रोख 50 हजार आणि 23 हजार रूपये किमतीचे दागिणे चोरीस गेले आहेत. या प्रकरणी खर्डा पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात कलम 454, 380 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, या प्रकरणी आजिनाथ भोरे (वय 50) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान,घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील,पोलिस नाईक संभाजी शेंडे, शशिकांत म्हस्के यांच्या टीमने भेट देऊन पाहणी केली. सदर घटनेचा पुढील तपास हेड काँस्टेबल आर के सय्यद हे करत आहेत.