जामखेड टाइम्स वृत्तसेवा : खुनाच्या गुन्ह्यात गेल्या 10 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीच्या त्याच्या राहत्या घरातून मुसक्या आवळण्याची धडक कारवाई जामखेड पोलिसांनी पार पाडली. स्वप्नील नामदेव थोरात असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
जामखेड पोलिस स्टेशनला गुरनं 485/ 2022 कलम 302, 34 भादवि प्रमाणे 24 ऑक्टोबर 2022 रोजी गुन्हा दाखल होता. मोबाईल चोरल्याचा कारणावरून आरोपींनी गणेश शिवाजी वारे (वय ३० वर्षे ) संगमजळगांव तालुका गेवराई जि बीड याचा खून केला.सदर, गुन्ह्यात यापुर्वी दिपक रणजित भवर व सुमंत डोके यांना अटक करण्यात आली होती. तर स्वप्नील नामदेव थोरात वय २९ वर्षे राहणार सावरगांव तालुका जामखेड हा आरोपी गेल्या 10 महिन्यांपासून फरार होता.
सदर आरोपीच्या शोध घेण्यासाठी जामखेड पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार केली होती. तो गेल्या काही दिवसांपासून आपले अस्तीत्व लपवून राहत होता. दि.०७/०८/२०२३ रोजी सदर आरोपी हा त्याच्या घरी आल्याची माहीती सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल बडे यांना मिळताच जामखेड पोलिसांच्या पथकाने सावरगांव येथे छापा टाकून स्वप्नील नामदेव थोरात याच्या मुसक्या आवळल्या. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असुन पुढील तपास चालु आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल बडे यांनी दिली.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली.या पथकात सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल बडे, पो.ना/कोपनर, पो.ना/अविनाश ढेरे,पो.ना/भागवत, पो.कॉ / परेदेशी, पोकॉ/विजय सुपेकर, पोकॉ/ नवनाथ शेकडे, पोकॉ/सचिन देवढे,म.पो.कॉ / धांडे यांचा समावेश होता.