चालत्या गाडीतून त्याने धूम ठोकली पण जामखेड पोलिसांच्या झडपेत तो अडकलाच !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : कर्जत पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस सिनेस्टाईल पध्दतीने जेरबंद करण्याची धडाकेबाज कारवाई जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या टिमने पार पाडली.सदर अटकेतील आरोपी हा जामखेड तालुक्यातील रहिवासी आहे. त्याच्याविरोधात कलम 399 व आर्म ॲक्ट 4/25 नुसार कर्जत पोलिस स्टेशनला 22 मार्च 2021 रोजी गुन्हा दाखल होता. तेव्हापासुन तो फरार होता अशी माहिती पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिली.

कर्जत पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी हा जामखेड शहरात आला असल्याची बातमी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. तेव्हापासुन जामखेडचे पोलिस त्या आरोपीच्या मागावर होते. गेल्या चार दिवसांपासून सदर आरोपी जामखेड पोलिसांना चकवा देत होता. परंतु 30 मार्च रोजी सदर आरोपी हा त्याच्या गावातून पुणे येथे सासुरवाडीला जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार गायकवाड यांनी जामखेड पोलिस स्टेशनच्या गुन्हेशोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांना तातडीने सदर बातमी सांगुन आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी रवाना केले होते.

असा रंगला अटकेचा सिनेस्टाईल थरार

जामखेड पोलिसांच्या पथकाने फरार आरोपीच्या गावाकडे जाणार्या रोडवर व कर्जत टी पाँईट जामखेड या दोन ठिकाणी सापळा लावला. परंतु सदर आरोपी हा त्याच्या गावाकडे न जाता दुस-या ठिकाणी जावुन लगेच पुणे येथे त्याचे सास-याकडे जायच्या तयारीत होता. तो आरोपी आपल्या चारचाकी गाडीतून कर्जत टी पाँईट या भागातून जात असताना जामखेड पोलीसांनी त्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपीने चालु गाडीतुन धुम ठोकण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस काँस्टेबल संदिप राऊत यांनी जीवाची बाजी लावत सदर आरोपीच्या अंगावर झडप टाकुन त्याला पकडले.  त्याचवेळी इतर पोलिस कर्मचार्यांनीही आरोपी पळून जाऊ नये यासाठी राऊत यांना मदत केली.

कर्जत पोलिस स्टेशनला दि 22 मार्च 2021 रोजी गु.र.नं.166/2021 भा.द.वि कलम 399 ,व आर्म ॲक्ट 4/25 नुसार गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथील शहाजी गोकुळ शिरगिरे हा आरोपी म्हणून निष्पन्न झाला होता. तेव्हापासुन तो फरार होता. त्याच्याविरोधात कर्जत पोलीस स्टेशनला दरोडा टाकणे , रस्तालुट करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जामखेड तालुक्यात दरोडे व जबरी चोरीच्या अनेक गंभीर घटना घडल्या आहे. शिरगिरे याच्या अटकेमुळे अनेक दरोड्याचे व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे असा अंदाज जामखेड पोलिसांनी वर्तवला आहे.

सदरची धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पार पडली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक रांजेद्र थोरात ,पोलिस काँस्टेबल संदिप राऊत,संग्राम जाधव,आबासाहेब आवारे, अविनाश ढेरे,अरूण पवार, विजयकुमार कोळी, संदिप आजबे यांचा समावेश होता.