विशाल सुर्वे हत्या प्रकरण : प्रियकराच्या मदतीने बायकोने काढला पतीचा काटा,पोलिसांनी ठोकल्या तिघांना बेड्या,जामखेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील विशाल सुर्वे या तरूणाच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात जामखेड पोलिसांना मोठे यश आले. अवघ्या चोवीस तासांत विशाल सुर्वे खून प्रकरणात तीन आरोपींना बेड्या ठोकण्याची धडक कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने पार पाडली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मयताच्या बायकोचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सुर्वे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या मंदिराजवळ विशाल सुर्वे याचा जितो टेम्पो आडवून कोणीतरी अज्ञात हल्लेखोरांनी विशाल सुर्वे याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने मारहाण करत जागीच ठार केले होते. ही घटना शुक्रवारी 13 मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी जामखेड पोलिसांत अज्ञात आरोपींविरुद्ध 14 मे रोजी खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान खुनाच्या घटनेचा उलगडा करण्यासाठी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करत वेगाने तपास हाती घेतला होता. पोलिसांच्या तपासात स्थानिक भागातील अनेकांवर संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी कसून तपास केला असता मयत विशाल सुर्वेचा खून त्याच्याच जवळच्या लोकांनी केल्याचे स्पष्ट झाले.  त्यानुसार जामखेड पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात आरोपी कृष्णा संजय सुर्वे, श्रीधर राम कन्हेरकर, पुजा विशाल सुर्वे या तिघांच्या मुसक्या आवळण्याची धडाकेबाज कारवाई पार पाडली. आरोपींमध्ये मयताच्या पत्नीचा समावेश आहे.

खुनाचे हे कारण आले समोर

मयत विशाल सुर्वे हा अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने आरोपी कृष्णा संजय सुर्वे याने मयताच्या पत्नीशी आणि त्याच्या मित्राशी संगनमत करून विशाल याचा खून केल्याचे पोलिस तपासांत समोर आले आहे. आरोपींनी विशाल याची अतिशय निर्घूणपणे हत्या केली होती.

न्यायालयाने ठोठावली पोलिस कोठडी 

विशाल सुर्वे खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

🔴 अतिरिक्त ऊसाच्या प्रश्नावर आमदार रोहित पवारांनी केली भूमिका स्पष्ट, रोहित पवार काय म्हणाले पहा ⤵️

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या 

विशाल सुर्वे खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जामखेड पोलिसांचे तीन ते चार पथक तपासावर होते. सर्वच पथकाने वेगाने तपास करत तिघा आरोपींना अटक करण्याची धडाकेबाज कारवाई पार पाडली. ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली. या पथकात पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलिस नाईक अविनाश ढेरे, संभाजी शेंडे, संग्राम जाधव, सचिन पिरगळ, विजय कोळी, अरूण पवार, आबासाहेब आवारे, संदिप राऊत, शेषराव म्हस्के, सह आदींचा सहभाग होता, तसेच या तपासात अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानेही आरोपींचा छडा लावण्यात मोठी कामगिरी केली.