जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील कोल्हेवाडी येथे आज दुपारी घरफोडीच्या दोन घटना घडल्या.या घटनांमध्ये अंदाजे दोन ते तीन लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनांमुळे कोल्हेवाडी आणि साकत परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. तसेच जामखेड पोलिस चोरट्यांचा वेगाने शोध घेत आहेत.
याबाबत सविस्तर असे की, कोल्हेवाडी येथील गोवर्धन आबा कोल्हे हे आपल्या कुटुंबियांसमवेत जामखेडला दवाखान्यात गेले होते. कोल्हे यांच्या घरी कोणीच नसल्याचा फायदा उठवत अज्ञात चोरट्यांनी कोल्हे यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटाची उचकापाचक करून सुमारे एक लाख रूपये किमतीचे दोन ते अडीच तोळे सोने लंपास केले आहे.
कोल्हेवाडी येथील गोवर्धन आबा कोल्हे यांच्या सूनबाई बाळंतपणासाठी जामखेडमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना भेटण्यासाठी संपूर्ण कुटुंब जामखेडला गेले होते. याच संधीचा फायदा उचलून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास केला असल्याची बाब कोल्हे कुटुंब घरी आल्यावर निदर्शनास आली. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली.
दरम्यान दुसरीकडे कोल्हेवाडीत आणखीन एक चोरीची घटना आज घडली आहे. या घटनेत रामदास सोनबा कोल्हे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख 60 हजार रूपये आणि एक तोळे सोन्याची दागिणे असा ऐवज घेऊन पोबारा केला.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार संजय लाटे, पोलिस नाईक अजय साठे, पोलिस काँस्टेंबल संदिप आजबे, सचिन पिरगळ, अरूण पवार, विजय कोळी यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आणि वेगाने तपास सुरु केला आहे.
दरम्यान कोल्हेवाडीत घडलेल्या चोरीच्या घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम जामखेड पोलिस स्टेशनला सुरू आहे.