जामखेड : तु बाजुला सरक नाहीतर तुला खतम करतो, पिस्टलचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी,तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; आरोपींमध्ये सराईत गुन्हेगाराचा समावेश !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जबरी चोरी, दरोडा व अग्निशस्र हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे नोंद असलेल्या एका सराईत गुन्हेगाराने त्याच्या ओळखीच्या मित्राला पिस्टलचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. या प्रकरणात आरोपीने पिस्टलचा धाकावर बळजबरीने गाडी पळवून नेण्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला तिघा जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत जामखेड पोलिस स्टेशनला अदनान जहुर शेख वय 20 वर्ष, रा. रसाळनगर, तपनेश्वर रोड, जामखेड या तरूणाने फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, 19/07/2023 रोजी रात्री 12/10 वा.चे. सुमारास मी व माझा मित्र प्रज्वल पालवे रा.तपनेश्वर गल्ली, जामखेड याच्यासोबत तपनेश्वर रोडवरील नुराणी कॉलनीकडे जाणाऱ्या कमानीजवळ इर्टिगा कारमध्ये काचा अर्धवट खाली करुन गाडीमध्ये गप्पा मारत बसलेलो होतो. त्यावेळी तेथे माझे परिचयाचा प्रताप उर्फ बाळा पवार रा. सारोळा ता. जामखेड हा व त्याच्यासोबत त्याचे दोन अनोळखी साथीदार असे माझ्याजवळ आले.
त्यावेळी प्रताप उर्फ बाळा पवार याने माझ्या गाडीचा दरवाजा उघडुन गाडीची चावी काढुन घेतली. तेव्हा प्रज्वल पालवे हा भितीने गाडीतुन खाली उतरला. तेव्हा बाळा पवार मला म्हणाला की, ‘ गाडी मला दे, मी तुला परत गाडी देणार नाही’ तेव्हा तो चावी घेवुन जात असताना मी त्याचे पाठीमागे गेल्यावर तो परत गाडीत येवुन गाडीचे ड्रायव्हर सीटवर बसला व गाडी चालु केली. मी गाडीत पाठीमागच्या सीटवर बसलो. त्यावेळी त्याने कार खर्डा रोडकडे घेतली सुमारे 50 फुट कार पुढे गेल्यावर त्याने कार थांबुन मला गाडीचे खाली उतरण्यास सांगितले. मी गाडीतुन न उतरल्यामुळे तो खाली उतरला व त्याचे अनोळखी दोन साथीदारांकडे जावुन त्यांच्यशी काहीतरी बोलणे करुन तोपरत माझ्याकडे आला.
मला कारमधुन बळजबळीने खाली उतरुन त्याने त्याचे कंबरेला लावलेले पिस्टल काढुन माझ्या डोक्याला लावले व म्हणाला की,”तु बाजुला सरक नाहीतर तुला खतम करतो” तेव्हा मी भितीने बाजुला झालो. त्यावेळी बाळा पवार हा कार चालु करुन खर्डा चौकाचे दिशेने निघुन गेला. तसेच त्याचे अनोळखी दोन साथीदार यांनी मला “तु आमचे नादाला लागशील तर तुला खतमच करतो” असे म्हणुन ते दोन वेगवेगळ्या मोटारसायकलवर गाडीच्या पाठीमागे निघुन गेले. त्यानंतर मी व प्रज्वल पालवे तक्रार देण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनकडे येत असताना वाटेतच आम्हाला पोलीस निरिक्षक पाटील साहेब व त्यांचा स्टाफ असे अर्बन बँक, शाखा- जामखेड समोर पोलीस वाहनात गस्त करताना दिसुन आले. पोलीसांना आम्ही वरील घटनेची हकीगत सांगितली. तसेच माझ्या गाडीत जी. पी. एस सिस्टीम आहे असे देखील कळविले.
त्यानंतर मी व माझा मित्र प्रज्वल पालवे असे पोलीसांसोबत त्यांचेकडील वाहनात बसुन माझी गाडी शोधण्याकरिता गेलो. गाडीचा जी.पी.सी च्या साह्याने आम्ही गाडीचा शोध घेत असताना आम्हाला माझी गाडी सारोळा रोड, जामखेड ता. जामखेड येथील रोडच्या बाजुला मोकळ्या पटांगणात मिळुन आली. गाडीमध्ये पाहणी केली परंतु तेथे कोणीही नव्हते. तसेच गाडीला चावी देखील नव्हती.
त्यानंतर पोलीस निरिक्षक पाटील साहेब व त्यांचे पोलीस स्टाफ वरील इसमांचा खर्डा रोडने शोध घेत असताना साई हॉटेल समोर रोडवर वरील तीन इसम मला दिसले. तेव्हा मी पो. निरिक्षक पाटील साहेब व पोलीस स्टाफला माझी गाडी पळवणारे हेच इसम असल्याचे हात करुन दाखविले. पोलीस स्टाफ तिन्ही आरोपींना पकडण्यासाठी गेला असता ते पोलीसांशी अरेरावी करुन झटापट करु लागले. त्यावेळी बाळा पवार याचे दोन अनोळखी साथीदार हे त्यास ‘बाळा फायर कर, यांना गोळ्या घाल’ असे म्हणत होते.
तेवढ्यात बाळा पवार याने त्याचे कंबरेचे पिस्टल काढुन पोलीसांचे दिशेने रोखले व पिस्टलचा खटका दाबला. परंतु त्यातुन फायर न झाल्याने त्याने परत पिस्टल लोड करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलीस निरिक्षक पाटील साहेब यांनी बाळा पवार याचे पायाचे दिशेने त्यांच्याकडील पिस्टलमधुन फायर केला. पिस्टलची गोळी बाळा उर्फ प्रताप पवार याच्या उजव्या पायाच्या पंजाला लागुन तो जखमी झाला.
बाळा पवार यास पोलीसांनी तात्काळ ताब्यात घेवुन त्याची पिस्टल देखील ताब्यात घेतली. त्यावेळी पिस्टलची पोलीसांनी पाहणी केली. पिस्टलमध्ये एक गोळी अडकलेली व मँगझिनमध्ये दोन गोळ्या असल्याचे मी पाहिले. तसेच त्याचेसोबत असलेले दोन साथीदार देखील पोलीसांनी पकडले. तेव्हा त्यांची नावे शुभम बाळासाहेब पवार व काकासाहेब उत्तम डुचे दोन्ही रा. सारोळा ता. जामखेड असे असल्याचे समजले. पोलीसांनी जखमी बाळा पवार व इतर त्याचे दोन साथीदार यांना वाहनामध्ये बसवुन घेवुन गेले.
त्यानंतर मी, पोलीस निरिक्षक पाटील साहेब व पोलीस स्टाफ जामखेड पोलीस स्टेशनला परत आलो असुन मी माझेसोबत घडलेल्या प्रकाराची तक्रार देत आहे. तरी आज 19 जूलै 2023 रोजी रात्री 12/10 वा.चे. सुमारास मी व माझा मित्र प्रज्वल असे माझे इर्टिगा कार नं. एम.एच-12 के.टी- 4795 हि मध्ये तपनेश्वर रोडवर नुराणी कॉलनीकडे जाणा-या कमानीजवळ गाडीमध्ये बसलेलो असताना इसम नामे 1) प्रताप उर्फ बाळा पवार याने माझे डोक्याला पिस्टल लावुन धाक दाखवुन बळजबळीने माझी इटींगा कार त्याचे साथीदार 2) शुभम बाळासाहेब पवार 3) काकासाहेब उत्तम डुचे सर्व रा. सारोळा ता. जामखेड यांचे मदतीने चोरुन नेली असे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला प्रताप उर्फ बाळा पवार, शुभम बाळासाहेब पवार, काकासाहेब उत्तम डुचे सर्व रा. सारोळा ता. जामखेड या तिघांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशन गु. र. न. 324/2023 भा द वी कलम 392, 504, 506, 34 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडे व अनिल भारती हे करत आहेत.