Jamkhed Exclusive NEWS : एक गोळी अन् वातावरण टाईट, पोलिस निरीक्षक महेश पाटील यांचा मुंबई पॅटर्न जामखेडमध्ये ॲक्शन मोडवर, गुन्हेगारांचे धाबे दणाणले !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड शहरात एका सराईत गुन्हेगाराने (criminal)पोलिसांवर पिस्टल (Pistol) रोखल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपुर्वी घडला. पोलिसांवर गोळीबार (firing) करण्याच्या उद्देशाने पिस्टल रोखणार्या गुन्हेगाराच्या पायावर पोलिस निरिक्षक महेश पाटील (PI Mahesh Patil) यांनी गोळीबार केला. मध्यरात्री रंगलेला हा थरार दोन दिवसांपासून जिल्ह्यात चर्चेत आलाय. गत काही वर्षांत पोलिसांकडून अश्या प्रकार झालेली ही पहिलीच कारवाई ठरलीय. यामुळे एक गोळी अन् वातावरण टाईट अशी परिस्थिती जामखेडच्या गुन्हेगारी वर्तुळात झाली आहे. (jamkhed Exclusive news)
गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून जगभरात मुंबई पोलिस दलाचा नावलौकिक आहे.याच पोलिस दलात मागील 13 वर्षे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी काम केले आहे. या काळात त्यांनी मुंबईतील विविध पोलिस स्टेशनला कामकाज केले. अतिशय निडरपणे त्यांनी आपली सेवा बजावली. या काळात त्यांनी अनेक खतरनाक गुन्हेगारांचा बंदोबस्त केला. 13 वर्षे मुंबई पोलिस दलात सेवा बजावल्यानंतर महेश पाटील हे चार महिन्यांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशनला रूजू झाले आहेत.
गेल्या चार महिन्यात पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी शांतता कमिटी, सर्व राजकीय पक्ष, सर्व धार्मिक संघटना यांच्या मीटिंग घेऊन सुसंवाद साधला आहे. तसेच रिक्षावाले, गॅरेज वाले, फोटो ग्राफर, हेअर सलून, मेडिकल शॉप, ज्वेलर व्यापारी, मंगल कार्यालय अशा सर्वांची मीटिंग घेऊन जनता व पोलीस यामधील अंतर कमी केले. सर्वांशी चांगला सुसंवाद राखण्याचे काम महेश पाटील यांनी केले. पीआय पाटील हे सर्वांना सन्मान देणारे अधिकारी म्हणून तालुक्यात लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात महेश पाटील यांना सर्व गोपनीय माहिती मिळणार आहे असेच दिसून येत आहे. गेल्या चार महिन्यात त्यांनी जामखेडचा बारकाईने अभ्यास केला. गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. आता पोलिस निरीक्षक महेश पाटील हे ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.
13 वर्षे मुंबई सारख्या मोठ्या शहरात काम केल्याचा मोठा अनुभव पाठीशी असलेल्या पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी जामखेडमध्ये केलेली एक कारवाई सध्या अहमदनगर जिल्ह्यात चर्चेत आली आहे. पिस्टल बाळगणारा एक गुन्हेगार पोलिसांच्या दिशेने गोळीबार करत असल्याचे पाहून पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी पोलिसांच्या स्वसंरक्षणार्थ थेट गुन्हेगारावर गोळीबार करण्याची धाडसी कारवाई केली. या कारवाईत गुन्हेगाराच्या पायावर गोळी लागल्याने तो जखमी झाला.
जामखेड तालुक्यातील गुन्हेगारी मोडून काढून कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी जामखेडचे पोलिस निरीक्षक महेश पाटील हे ॲक्शन मोडवर आल्याचे दोन दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. गुन्हेगारांविरोधात पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी उघडलेल्या मोहिमेमुळे जामखेडमधील अवैध कट्टे व पिस्टल बाळगणाऱ्या तथाकथित गुंडांचे धाबे दणाणून गेले आहेत. जामखेड शहर व तालुक्यात गावठी कट्टे व पिस्टल बाळगणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या सर्वांवर लवकरच मोठी कारवाई होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जामखेडमध्ये अगामी काही दिवसांत जामखेड पोलिसांकडून मोठ्या कारवाईचा धमाका होणार हे स्पष्ट आहे.
‘मुंबई पॅटर्न’ जामखेडमध्ये कार्यरत ?
गुंडामुक्त जामखेड.. गुन्हेगारीमुक्त जामखेड.. गावठी कट्टे मुक्त जामखेड यासाठी जामखेडमध्ये ‘मुंबई पॅटर्न’ राबवण्याची तयारी जामखेड पोलिसांनी हाती घेतली आहे. त्यादृष्टीनेच पोलिस निरीक्षक महेश पाटील हे आता ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सामान्य जनतेतून स्वागत केले जात आहे.
पोलिस निरीक्षक महेश पाटील ॲक्शन मोडवर
मराठवाड्याच्या सरहद्दीवर वसलेल्या जामखेड तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे. गेल्या काही वर्षांत कलाकेंद्र, गुंडगिरी, गुन्हेगारीची किड रुजली, फुलली, वाढली आहे. राज्यातल्या कुख्यात, कुप्रसिद्ध, गुन्हेगारांचा राबता गेल्या काही वर्षांत नगररोड, बीडरोडच्या ‘कलामंदिरात’ वाढला अन् जामखेडच्या मातीत गुंडांच्या टोळ्या सक्रीय झाल्या, गावठी कट्टे बाळगणारे वाढले, चंदन तस्करी, गांजा तस्करी, अवैध सावकारी, दहशतीच्या बळावर जमिनी बळकावणारे, वाळू माफिया, रेशन माफिया, मोटारसायकल चोर, मटका किंग, जुगार माफिया यांचे उदंड पिक आले. कमी श्रमात अधिक पैसा कमवण्याच्या मोहात मिसरूड न फुटलेली तरूण टाळकी गुन्हेगारांच्या संपर्क आली.यातून जामखेडमध्ये भाईगिरीचे फॅड जोमात वाढले. खून, मारामाऱ्या, दहशत, दबाव, झुंडशाहीचा थरार जामखेडला नित्याचा आहे. गोळीबाराच्या घटना अधून घडतात. गोळीबारामुळे यापुर्वी दोघांना आपला जीव गमवावा लागलाय. हा इतिहास नजरेसमोर ठेवून जामखेडमध्ये बोकाळलेल्या गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालण्यासाठी पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी कंबर कसली आहे.
त्या कारवाईची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा
पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी दोन दिवसांपुर्वी केलेली कारवाई संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात चर्चेत आहे. गाडी चोरून पळालेल्या गुन्हेगारावर पीआय पाटील यांनी गोळीबार करत त्याला व त्याच्या साथीदारांना पकडण्याची धाडसी कारवाई केली. कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगारांची गय केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश यातून गेला आहे. यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणून गेले आहे. जामखेडमध्ये जामखेड पोलिसांनी कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी उचललेल्या पावलाचे जनतेतून स्वागत होत आहे. यात सातत्य राखण्याची आवश्यकता आहे.