जामखेड टाइम्स वृत्तसेवा । गहाळ झालेला अथवा एखाद्या ठिकाणी विसरलेला मोबाईल लवकर मिळाला नाही तर आपण तो मोबाईल सहज सोडून देतो, परंतु पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर मोबाईलचा शोध लागतो का ? या प्रश्नाचे उत्तर हो आहे, कारण चार ते पाच महिन्यांपासून गहाळ झालेले दोन ते अडीच लाख रूपये किंमतीचे मोबाईल शोधून काढण्यात जामखेड पोलिसांना यश आले.
जामखेड पोलिसांत गेल्या काही दिवसांपासून मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. गेल्या 4 ते 5 महिन्यापासून तपास केला असता पोलिसांना 9 मोबाईल शोधून काढण्यात यश आले. जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने मोबाईल धारकांना त्यांचे मोबाईल आज परत करण्यात आले. गहाळ झालेल्या मोबाईलमध्ये Samsung, Real Me, Redmi, Oppo, Vivo अशा विविध कंपन्यांचे मोबाईल होते. या नऊ मोबाईलची एकूण अंदाजे किंमत 2 ते 2.5 लाखापर्यंत आहे.
गहाळ मोबाईल शोधून काढण्यासाठी आमची पोलीस टीम व मोबाईल सेल विभागाचे प्रशांत राठोड यांनी उत्कृष्ट कार्य केले असे सांगत मोबाईलच्या किमतीपेक्षा त्यामध्ये असणारा डाटा व डॉक्युमेंट अतिशय महत्त्वाचे असतात. बाजारामध्ये कमी किमतीत अनेक मोबाईल विकले जातात. ते मोबाईल चोरीचे असू शकतात. कमी किमतीच्या मोहात न पडता तरुणांनी असे मोबाईल सापडले असता जामखेड पोलीस स्टेशनमध्ये जमा करावेत असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी केले आहे.
दरम्यान आज जामखेड पोलिस स्टेशनमध्ये नऊ मोबाईल धारकांना त्यांचे हरवलले मोबाईल परत करण्यात आले. मोबाईल हाती पडतात त्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते. मोबाईल मिळताच मोबाईल धारकांच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशन व अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलिस नाईक अविनाश ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल आबासाहेब आवारे, विजय कोळी, दत्तू बेलेकर, अरुण पवार, संग्राम जाधव, संदीप राऊत, सायबर विभागाचे प्रशांत राठोड सह मोबाईल धारक उपस्थित होते.
यांनी केली कामगिरी
जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांनी गहाळ मोबाईल रजिस्टरी नोंद केले व त्याची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात ,पोलीस कॉन्स्टेबल आबा आवारे व पोलीस कॉन्स्टेबल विजय कोळी यांच्यावर दिली. त्यांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी मोबाईल सेलचे प्रशांत राठोड यांचे संपर्कात राहून पाठपुरावा केला आणि गहाळ झालेले 9 मोबाईल मिळवण्यात यश मिळवले.