जामखेड पोलिसांच्या कामगिरीचे व्यापारी वर्गातून होत आहे कौतूक; जामखेड पोलिसांनी केला 01 लाख 70 हजाराचा मुद्देमाल परत !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । दोन महिन्यांपुर्वी जामखेड पोलिस स्टेशन हद्दीतील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या किराणा दुकानातील 77 तेलाचे डबे चोरीस जाण्याची घटना घडली होती. त्यानंतर गुन्हा दाखल होताच जामखेड पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेतला. आरोपींकडून मुद्देमाल जप्त केला होता. जप्त केलेल्या तेलाच्या 77 डब्यांचा मुद्देमाल जामखेड न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादी व्यापाऱ्यास आज जामखेड पोलिसांकडून परत देण्यात आला.
जामखेड शहरातील प्रसिद्ध किराणा व्यापारी वसंत नंदकिशोर तोडकरी यांच्या बस स्टॅन्ड समोरील तोडकरी किराना दुकानातून 01 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 च्या दरम्यान तेलाच्या डब्यांचा अपहार करण्यात आला होता. त्यानुसार जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 369/ 2022 भा द वि कलम 408 प्रमाणे 4 ऑगस्ट 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे सदर गुन्ह्याचा तपास करत होते. तपास करत असताना लहू बाजीराव सांगळे राहणार करेवाडी, तालुका आष्टी, अलीम उर्फ आलम दादा शेख राहणार नान्नज व सुरेश भगवान गंभीरे राहणार सरदवाडी तालुका जामखेड यांना ताब्यात घेण्यात आले होते. या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली होती.
अटकेतील तिघा आरोपींनी 01 लाख 69 हजार 275 रुपये किमतीचे जेमिनी सोयाबीन, जेमिनी सूर्यफूल, दीपसन सोयाबीन, पामोलीन अशा खाद्यतेलाच्या कंपनीचे एकुण 77 तेलाचे डबे चोरल्याची कबुली होती. हा सर्व मुद्देमाल जामखेड पोलिसांनी जप्त केला होता.
जामखेड पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेले तेलाचे डबे जामखेड कोर्टाच्या आदेशाप्रमाणे फिर्यादी वसंत नंदकिशोर तोडकरी यांना आज परत केले आहेत. जामखेड पोलिसांनी सदर गुन्ह्यात तत्परता दाखवत आरोपी आणि मुद्देमाल यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली. तसेच जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादीस तातडीने परत करण्यासाठी योग्य कार्यवाही पार पाडली. व्यापारी वर्गातून जामखेड पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.
पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलिस हेड काँस्टेबल संजय लाटे, पोलिस नाईक अविनाश ढेरे, पोलिस काँस्टेबल आबासाहेब आवारे, पो कॉ विजयकुमार कोळी,पो कॉ विजय सुपेकर,पो कॉ अरुण पवार यांच्या पथकाने सदर कारवाई पार पाडली.